Breaking News

सलून, ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

रोहा नाभिक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

धाटाव : प्रतिनिधी

नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व  ब्युटीपार्लर सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी रोहा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने जवळपास वर्षभर सलून व  ब्युटीपार्लर  बंद होते, त्यामुळे हातावर पोट असलेला नाभिक समाज आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभर सलून बंद ठेवल्याने थकित वीज बिले, घरभाडे, मुलांच्या शाळेची फी अद्याप पूर्ण भरता आली नाही. राज्य सरकारकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तसेच निवेदन देऊनही अद्याप कसलीही मदत मिळालेली नाही.

राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर करून सलून व ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने नाभिक समाजबांधव हवालदील झाले आहेत. आजवर सलून व ब्युटीपार्लर व्यवसायातून संसर्ग झाल्याचे एकही तक्रार नाही, मग याच व्यवसायावर व समाजावर अन्याय का? असा सवालही नाभिक समाजाने या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

नाभिक समाजबांधवांना उत्पन्नाचे इतर कोणते साधन नसल्यामुळे सलून व ब्युटीपार्लर व्यवसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ व रोहा अष्टमी नाभिक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेले हे निवेदन नायब तहसीलदार निलम ढोरजकर यांनी स्वीकारले. या वेळी समाजाचे शहर अध्यक्ष मंगेश रावकर, जिल्हा पदाधिकारी यशवंत खराडे, तसेच सदानंद साळुंखे, रोहित मोहिते, सतीश दिवेकर, अशोक कदम, नागेश खराडे, शेखर सकपाळ, विजय रावकर, मगेश सकपाळ, बळीराम काशीद, यशवंत पावर, समीर दिवेकर, आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply