पनवेल : प्रतिनिधी
खांदा वसाहतीतील प्रवेशद्वारावर सिग्नलजवळ रविवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करून स्पीड ब्रेकर बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी पाठपुरावा, तर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार लवकरच दोन्ही बाजूंनी वेगाने येणार्या वाहनांची गती कमी करून अपघात टाळण्यास मदत होईल, असा विश्वास भोपी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या एका बाजूला खांदा वसाहत, तर दुसर्या बाजूला खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे वसाहतीच्या प्रवेशद्वारावर एक प्रकारे जंक्शनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने येथे येतात. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने खांदा वसाहतीत सब-वे तयार केला आहे. तो वाहतुकीसाठीसुद्धा खुला करण्यात आला आहे. परंतु या ठिकाणाहून वाहने वेगाने जा-ये करतात. अनेकदा सिग्नल तोडूनसुद्धा महामार्ग ओलांडून जातो. रविवारी अशाच प्रकारे एसटीखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. एकंदरीतच दररोज अपघात घडतात. ते टाळण्यासाठी प्रभाग
समितीचे सभापती संजय भोपी यांनी वेगवान वाहनांना आवर घालण्यासाठी गतिरोधक असण्याची गरज व्यक्त केली. ही बाब त्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार ठाकूर यांनी टी आयपीएलच्या अभियंत्यांना दोन्ही बाजूचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी त्वरित गतिरोधक बसवण्याचे आदेशही सभागृह नेत्यांनी संबंधित अभियंत्यांना दिले. तांत्रिक बाबी तपासून तसेच वाहतूक पोलीस आणि सिडकोशी सल्लामसलत करून अपघात प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येणार असल्याचे टीआयपीएल कंपनीच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले.