Breaking News

रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

नेरळ ग्रामपंचायतीची मागणी

कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ गावातील आठ रस्त्यांची कामे मंजूर करून, त्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्याचे रुंदीकरण करताना अनेक ग्रामस्थांच्या घरांचे, कुंपणांचे नुकसान झाले होते. रस्त्याचे काम झाल्यानंतर ते पुन्हा दुरुस्त करून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते. मात्र ठेकेदाराने आजपर्यंत त्यातील अनेक कामे पूर्ण केली नसल्याने, त्या सर्व ग्रामस्थांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. मात्र ‘ती’ कामे पूर्ण करून देण्याबाबत ठेकेेदार केवळ आश्वासन देत असल्याने शेवटी ग्रामपंचायतीने ठेकेदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरपंच जान्हवी साळुंखे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे यांच्या सहीचे पत्र नेरळ ग्रामपंचायतने पोलिसांकडे सादर केले आहे. त्यात रस्त्यांची कामे करणारी ठेकेदार कंपनी मिरॅकल इंजिनियर्स कंपनीचे संचालक जगदीश द्वारकानाथ वाघेला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रात करण्यात आहे.

रस्ता रुंदीकरणाच्या कामात तोडलेल्या नेरळ गावातील  स्मारकांचे सुशोभीकरण करणे, जिजामाता तलावाचे तोडलेले गेट उभारणे, लोकमान्य टिळक वाचनालय भिंत, डॉ. लाड क्लिनिक येथील गटारे, कुंभारआळी शाळेसमोर संरक्षण भिंत आणि कांबळे यांच्या घराचे बांधकाम आणि नागरिकांची इतर अनेक कामे ठेकेदार कंपनीने अर्धवट ठेवली आहेत. त्या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे. नेरळ पोलीस त्याबाबत कोणती भूमिका घेतात? ठेकेदार कंपनी अर्धवट असलेली कामे पूर्ण करणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply