Breaking News

‘भारत बंद’चा रायगडात फज्जा

अलिबाग : प्रतिनिधी

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या मंगळवार (दि. 8)च्या भारत बंदचा रायगड जिल्ह्यात फियास्को उडाला. बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जवळपास सर्व व्यवहार सुरू होतेे. एसटी व खासगी वाहतूूकदेेखील सुरळीतपणे चालू होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही रायगड जिल्ह्यात भाजप वगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला होता. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीही बंद यशस्वी करण्याचे आवाहन केल्याने जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जाईल असे वाटत होते, मात्र जिल्ह्यातील नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील सर्व दुकाने मंगळवारी खुली होती. भाजीपाला, फुलविक्रेते यांचे स्टॉल्स सकाळपासूनच उघडे होते. हॉटेल्सही उघडली होती. सरकारी कार्यालयांबरोबरच खासगी कार्यालये सुरू होती. तेथील कर्मचारी उपस्थितीदेखील चांगली असल्याचे पहायला मिळाले. रस्त्यावरील वर्दळ सकाळच्या सुमारास कमी होती. नंतर मात्र नेहमीसारखी रहदारी वाढली. काहींनी सकाळच्या सत्रात दुकाने उघडणे टाळले, परंतु नंतर सर्वच दुकाने उघडली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी असेच चित्र दिसून आले. एसटी बससेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. रिक्षा, टॅक्सी व अन्य खासगी प्रवासी वाहतूक, जलवाहतूक सेवादेखील चालू होती. एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व व्यवहार अगदी सुरळीत सुरू होते. पनवेलमध्ये शेतकर्‍यांच्या निदर्शनांना पाठिंबा दर्शवण्याकरिता शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन महाविकास आघाडीतील पक्षांमार्फत करण्यात आले, मात्र त्यानंतरही काही व्यापार्‍यांनी आपली दुकाने सुरू ठेवल्याने महविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वत्र फिरून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसत होते. शिवाय या बंदमध्ये शहरातील रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले नसल्याने रिक्षा, टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. दरम्यान, बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

शेतकरी संघटना, किसानपुत्र आंदोलनचा बंदला विरोध

मुंबई : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 8) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती, मात्र या बंदला महाराष्ट्रातील काही संघटनांनी विरोध दर्शविला. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेने या बंदला थेट विरोध केला, तर किसानपुत्र आंदोलननेही बंदमध्ये सहभागी होण्याचे टाळले. किसानपुत्र आंदोलनचे प्रणेते अमर हबीब यांनी सांगितले की, कोरोनामुळे केंद्र सरकारने काही निर्णय घेतले. आशेचे किरण दिसत असताना हे आंदोलन सुरू झाले. किसानपुत्र आंदोलनचा या आंदोलनाला विरोध नाही. शेतकर्‍यांच्या कुठल्याही आंदोलनाला विरोध नाही, मात्र आम्ही या बंदमध्ये सहभागी नाही. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा बंदला विरोध असल्याचे माजी आमदार व शेतकरी नेत्या सरोज काशीकर यांनी स्पष्ट केले होते. स्पर्धेतून विकास होतो यावर संघटनेचा विश्वास असून, शेतकरी संघटनेचे केंद्राच्या कायद्यांना समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. हे कायदे वाचले असता, 35 वर्षे वाट पाहत असलेली पहाट आता उगवल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान, सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेशीवर काही शेतकर्‍यांनी वेढा दिला आहे. केंद्र सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये बुधवारी (दि. 9) पुन्हा बैठक होणार आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply