पोलादपूर : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून कोविड काळात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शहराच्या सुरक्षिततेपोटी हा घरोघरी जाऊन विजेत्यांच्या कौतुकाचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवला आहे. शहराची सुरक्षा हेच आमचे ब्रीद आहे, असे विचार पोलादपूर शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला तथा माई जयंत शेठ
यांनी मांडले. शहर भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले व रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
दिवाळीत लहान मुलांनी तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृती आणि महिलांनी साकारलेल्या रांगोळी स्पर्धांमुळे शहरात निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले असून आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिवाळीत घेतलेल्या रांगोळी व किल्ले स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांच्या घरी जाऊन अभिनंदन केले. या वेळी शहर आघाडी अध्यक्षा माई शेठ यांच्यासमवेत कलिका अधिकारी, तनुजा भागवत, अनु पटेल, सपना बुटाला, माई शिंदे, उज्वला सागवेकर, शिला बुटाला, जान्हवी तलाठी आदी कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होत्या.
किल्ले स्पर्धा लहान गटामध्ये जोगेश्वरी गाडीतळ येथील सर्वेश संतोष जगताप 1001 रुपयाचे प्रथम पारितोषिक, शिवाजीनगर येथील संस्कार सतीश कोंगे यास 501 रुपयाचे द्वितीय पारितोषिक, जय तलाठी यास 251 रुपयाचे तृतीय पारितोषिक तर मयंक साळुंखे आणि वैष्णवी हेमंत कदम यांना उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे.
किल्ले स्पर्धा मोठ्या गटामध्ये माऊली मित्रमंडळ 501 रुपयाचे प्रथम पारितोषिक व आनंदनगर मित्रमंडळ 501 रुपयाचे द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे. रांगोळी स्पर्धेत सिध्देश्वर आळीतील विद्या पवार यांस 1001रुपयाचे प्रथम पारितोषिक, जोगेश्वरी गाडीतळ येथील श्रेया जाधव यांना 501 रुपयाचे द्वितीय पारितोषिक तर भैरवनाथनगर येथील अंकिता जंगम यांस 251 रुपयाचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे तर प्रभातनगर येथील कविता पटेल, बाजारपेठ येथील दुर्वा शेठ व सैनिक नगर येथील पूर्वा खरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात येणार आहे.