Monday , January 30 2023
Breaking News

उद्धव ठाकरेंची माझ्यावर पाळत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांची मोट बांधण्यात आलेली आहे, मात्र काही दिवसांपासून या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. विशेषकरून काँग्रेस पक्ष नाराज असून, काँग्रेसला डावलले जात असल्याच्या भावनेतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत. त्यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नाराही दिला आहे.
लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात पहिल्यांदा बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांनी टीकेची धार अधिक तीव्र केल्याचे दिसते. पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी 9 वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरू आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री 3 वाजता माझी सभा पार झाली हे कोणाला माहिती नसेल, पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजर्‍यात आणण्याचा प्रयत्न करणार, असा आरोपही या वेळी पटोले यांनी केला.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना मात्र पटोलेंनी यू-टर्न घेतला.  माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे बोलघेवड्या पटोलेंचा बार प्रत्यक्षात मात्र फुसका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply