कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील लाखरन गावामधील एका शेतकर्याने रताळ्याचे पीक घेतले असून त्यापैकी एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. लाखरन येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपारिक पिके घेऊन, ही पिके आपल्याकडे होत नाहीत, हे जुन्या शेतकर्यांचे म्हणणे खोडून काढले होते. यावेळी त्यांनी रताळ्याचे विक्रमी पीक काढले असून एक ते साडेतीन किलोपर्यंत एकेका रताळ्याचे वजन आहे. पुणे येथील एस. बी. ऍग्रोटेक कंपनीचे अगरवाल व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी भाजीपाला व फळांच्या अपारंपारिक पिकांवर लक्ष केंद्रित करणारा शेतकर्यांचा एक समूह तयार केला आहे. या शेतकर्यांना लागणारे अद्ययावत बियाणे, खते विशेषतः सिलिकॉन तसेच लागवडीबाबत इतरही मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे काम ते कोणतीही अपेक्षा न ठेवता करीत असतात.
आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून जास्तीतजास्त उत्पादन कसे निघेल, याकडे मी नेहमी लक्ष देतो. रताळ्याचे पीक घेताना मल्चिंग पेपर व सिलिकॉन खताचा खूप फायदा झाला.
-सूर्यकांत भासे, प्रगतशील शेतकरी, लाखरन, ता. कर्जत
शेतकर्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळावे तसेच एका शेतकर्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य शेतकर्यांना त्याचा फायदा व्हावा, या हेतुने शेतकर्यांचा समूह तयार करण्यात आला आहे. -पुंडलिक पाटील, माजी बांधकाम सभापती, राजिप तथा भाजप नेते