Saturday , June 3 2023
Breaking News

महिलांनो, स्वावलंबी बना! उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रेंचे आवाहन

उरण : वार्ताहर

आधुनिक युगात समाज परिवर्तन घडत असून, या सामाजिक परिवर्तनाची कास धरून महिलांनी आता अबला न राहता सबला बनून उद्योगधंद्याच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, असे आग्रही प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी गोवठणे केले. गोवठणे येथे वंदे मातरम सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास नीता महेश बालदी, नगरसेविका आशा शेलार, जान्हवी पंडित, भाजप महिला मोर्चा उरण तालुका अध्यक्षा संगीता पाटील, खोपटेच्या सरपंच विशाखा ठाकूर, वंदे मातरम संस्थेच्या सचिव व भाजप महिला मोर्चा तालुका सरचिटणीस राणी म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

नगराध्यक्षा सायली म्हात्रे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाचा मंत्र देऊन नवा मार्ग दाखविला. त्यामुळे आज स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार प्राप्त झाले आहेत. पर्यायाने स्त्रियांनी सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असताना ग्रामीण भागातील स्त्रिया तुलनेने अजूनही प्रगतीच्या वाटेवर येताना दिसत नाही. या स्त्रियांनी आता उद्योगधंद्याची कास धरून आपली प्रगती साध्य केली, तर गावांचा नक्की विकास होईल.

या वेळी शाब्बास सुनबाई… शाब्बास सासूबाई हा पैठणीचा खेळ घेण्यात आला. अत्यंत रंगतदार झालेल्या या खेळात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. विविध स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम संस्थेचे अध्यक्ष सूरज म्हात्रे, श्वेता मढवी, दीपाली पाटील, रेश्मा कडू, निशा म्हात्रे, स्मिता म्हात्रे, स्वाती पाटील, विश्रांती म्हात्रे आदींचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply