Wednesday , February 8 2023
Breaking News

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’

पार्थ पवार पुन्हा ट्रोल

पुणे : प्रतिनिधी

पहिले भाषण, पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचे सांगणे अशा एक ना अनेक गोष्टींवरून मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अनेकदा ट्रोल झाले आहेत. या वेळी वादग्रस्त फादरची भेट घेतल्याने पार्थ टीकेचे धनी ठरले.

दोन दिवसांपूर्वी दापोडीतील विनियार्ड चर्चेमध्ये पार्थ पवार प्रचारासाठी पोहोचले होते. या वेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक रोहित काटे, मार्ई काटे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे उपस्थित होते. तेव्हा या चर्चचे पास्टर डेव्हिड सिल्व्हवे यांच्याकडून ‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’ असे आशीर्वाद पार्थ यांना मिळाल्याची माहिती आहे. असाध्य रोगांवर उपचार करीत असल्याचा सिल्व्हवे दावा करतात. त्यामुळे ते वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर हल्लाही झाला होता. अंधश्रद्धा पसरविणार्‍या धर्मगुरुची भेट घेतल्याने पार्थ पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत.

वास्तविक, हा चर्च असलेला काही भाग हा ख्रिश्चनबहुल आहे. त्यामुळे या मतांसाठीच पार्थ पवार यांनी या पादरी महाशयांना भेट दिली, अशी टीकादेखील होत आहे.

‘महाराष्ट्राचा पप्पू’

अशा पद्धतीने कोणत्याही तार्किक पातळीवर सिद्ध होऊ न शकणारे उपचार करणार्‍या ख्रिस्ती पादरीची पार्थ पवारांनी भेट घेतल्यामुळे खरा वाद सुरू झाला. एकीकडे त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायम पुरोगामित्वाची कास धरली. सुप्रिया सुळे यांनी तर काही प्रसंगी सत्यनारायणाच्या पूजेलादेखील विरोध केला आहे, पण पार्थ मात्र अशा प्रकारे अंधभक्ती पसरवणार्‍या व्यक्तीची भेट घेतात, हे नेटिझन्सला पटलेले नाही. त्यामुळे अनेकांनी ‘महाराष्ट्राचा पप्पू’ अशी त्यांची हेटाळणी केली आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply