राज्यासह देशभरातील रुग्णांचा आकडा वाढला
मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्था
चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून, भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने शनिवारी (दि. 21) जाहीर केलेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत संपूर्ण देशभर 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 258 होती. म्हणजेच 40 जणांची भर पडली. यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, तर महाराष्ट्रात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने राज्यातील लागण झालेल्यांचा आकडा 52वरून वाढून 63वर पोहचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात आजपासून 111 नव्या लॅब सक्रिय झाल्या असल्याचे या वेळी सांगण्यात आले. देशात चार जणांनी आपले प्राण गमावलेत. असे असले तरी देशातील जनतेने घाबरून जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी रुग्ण आढळले आहेत. नवीन 11 रुग्णांपैकी आठ जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावा आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गापासून दूर राहा, स्वत:ची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन प्रशासन करताना दिसत आहे.