पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल परीसरात दोन व्यक्तींकडून बिबट्याची कातडी व नखे हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेने केली आहे.
मोर्बी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन व्यक्तींकडे बिबट्याची कातडी व नखे असल्याची बातमी मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेच्या पोलीस नाईक सविन टिके यांना मिळाली होती. त्यानुसार या दोन व्यक्तींना ताब्यात घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, नवी मुंबई गुन्हे शाखेचे डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उप आयुक्त प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनासाठी मध्यवर्ती कक्ष येथील अधिकारी व अमलदार यांनी मोर्थी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागामध्ये दोन दिवस सापळा लादुन पाळत ठेवली.
3 डिसेंबरला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने मोरबी धरणाजवळील भल्याचीवाडीपासून दोन किलो मीटर आतमध्ये असलेल्या डोंगराळ जंगल भागामध्ये सापळा रचुन तेथील एका झोपडीमध्ये गणपत पालकु लोभी (वय 26, रा.पालेखुर्द पो.वांवजे ता. पनवेल) गणपत राघु वाघ (वय 55, रा.पालेखुर्द पो.वांवजे ता.पनवेल) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे असलेल्या गोणीमध्ये प्राण्याची कातडी मिळुन आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क करून कातड्याचे निरीक्षण केल्यास ते बिबट्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही व्यक्तींकडे चौकशी केल्यानंतर साधारण: दिड महिन्यापूर्वी मोरबी धरणाजवळील जंगलामध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत पडलला होता. त्या वेळेस बिबट्याचे कातडे काढून नखे व जबडा वेगळे केल्यानंतर बिबटयाचे मांस काढून ते शिजवुन खाल्ल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली.
गुन्ह्याचा पुढील तपासादरम्यान बिबट्याची चार नखे त्यांच्या पालेखुर्द येथील घरातुन हस्तगत करण्यात आलेली आहेत. उर्वरीत नखे, जबडा व उर्वरीत अवशेष याबाबत तपास चालु आहे. ही कामगिरी नवी मुंबई गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहाय्यक निरीक्षक निलेश तांबे, सहाय्यक फौसदार संजय पवार, पोलीस अमंलदार शशिकांत शेंडगे, सविन टिके, किरण राउत, विष्णु पवार, प्रकाश सांळुखे, मेघनाथ पाटील व उर्मीला बोर्हाडे यांनी केलेली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा हे करीत आहे.