आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश
नवी मुंबई : प्रतिनिधी
एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे व वाशी येथील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी गतवर्षी केली होती. त्याला आता यश येत आहे.
याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज यांची भेट घेतली. एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या 460 मच्छीमार बांधवांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीची दखल घेत एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तांनी 15 दिवसांत नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
एमएमआरडीएकडून ही नुकसानभरपाई दोन टप्प्यांत देण्यात येणार असून बिकट परिस्थितीत मदत मिळणार असल्याने मच्छीमार बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी वरिष्ठ अभियंता गणेश देशपांडे, भाजप युवा मोर्चा महामंत्री जगन्नाथ कोळी, अनंता बोस, तुकाराम कोळी, प्रेमनाथ कोळी, सुनील बाये, कैलास कोळी, ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते.
आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे तसेच वाशी गाव येथील कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. न्हावा ते शिवडी सी-लिंक कॉरिडोअर ब्रिजचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना या परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. न्हावा-शिवडी सागरी पुलाच्या कामामुळे या ठिकाणी मासेमारी करणार्या शेकडो स्थानिक कोळी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांची दयनीय अवस्था झाली आहे. एकूण 460 मच्छीमार बांधव एमएमआरडीएच्या सर्वेक्षणातून पात्र झाले असून येत्या 15 दिवसांत टप्प्याटप्प्याने नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सूचित केले आहे.