नवी मुंबई मनपा प्रशासनाचे कारवाईचे निर्देश
नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने या वर्षी इंग्रजी माध्यमाच्या 14 अनधिकृत शाळांची नावे घोषित केली आहेत. या शाळा बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, महापे गाव, घणसोली, ऐरोली, रबाळे आदी परिसरात आहेत. विशेष म्हणजे या शाळांना मागील शैक्षणिक वर्षातदेखील शिक्षण अधिकारी संदीप सांगवे यांनी अनधिकृत शाळा म्हणून घोषित केले होते.
शिक्षण विभागाने मागील वर्षी एप्रिल महिन्यात अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करताना या शाळा त्वरित बंद केल्या नाहीत, तर एक लाख रुपये दंड आकारला जाईल, असे जाहीर केले होते, परंतु यंदासुद्धा अनधिकृत शाळा जाहीर करताना तीच नवे जाहीर केली आहेत. मग त्या एक लाख रुपये दंडाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनधिकृत शाळा घोषित केल्यानंतर त्यावर अंकुश ठेवणे हे मनपा शिक्षण विभागाचे काम होते, परंतु शासनाच्या आदेशाचे पालन करीत शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करून आपले काम पूर्ण केले, पण त्यावर प्रतिबंध करण्यास मनपा शिक्षण विभागाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.
ज्या शाळा अनधिकृत आहेत त्या ठिकाणी शिक्षण विभागाने प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांना दिसेल व समजेल अशा प्रथमदर्शनी भागात बॅनर लावले, तर अनधिकृत शाळेत कुणीही आपल्या पाल्याला टाकणार नाही, अशी अपेक्षा पालकवर्ग करत आहेत.
घणसोली गावातील चिंचआली येथे रिश्चर एज्युकेशन ट्रस्टची सेंट ज्यूड स्कूल आहे. ही शाळा सध्या घणसोली सेक्टर 1मध्ये भरत आहे, परंतु शिक्षण विभागाच्या दप्तरी नोंद घणसोली चिंच आली आहे.
शिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत या शाळेचा पत्ता घणसोली चिंचआली हेच दिसून येते. त्यामुळे अनधिकृत यादी प्रसिद्ध करताना अधिकारी झोपले होते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.