रेवदंडा ः प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल व दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. रेवदंड्यातील बीट मार्शल व दामिनी पथकाच्या भरारीने एका प्रसंगात ताटातूट झालेल्या मायलेकाची भेट घडवून आणली.
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यातील मांडळा ग्रामपंचायत हद्दीत मांडळा गावात 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक वृध्द महिला फिरत असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई चोरगे, मल्लाव व दामिनी पथकाच्या पोलीस नाईक भोईर व पाटील हे मांडळा येथे जाऊन त्यांनी वृध्द महिलेचा शोध घेतला. त्यानंतर त्या महिलेस रेवदंडा पोलीस ठाणे येथे घेऊन आले. तेथे रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांनी सदर महिलेची विचारपूस केली. पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक भोईर, महिला सहा. फौजदार गोसावी, पोलीस नाईक पुळेकर, पोलीस शिपाई म्हात्रे यांनीही महिलेस विश्वासात घेत विचारपूस केली. यामध्ये या महिलेचे नाव प्रतिमा प्रकाश घाग असल्याची माहिती प्राप्त होऊन ती वाकीपाड, वसई येथील रहिवासी असल्याचे कळाले. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस फौजदार गोसावी व पोलीस नाईक पुळेकर यांनी पालघर जिल्हा पोलीस कट्रोल रूमशी संपर्क करून वसई पोलीस ठाण्याचे फोन नंबर मिळविले. वसई पोलीस ठाणे येथे फोन करून या संदर्भात माहिती दिली असता हे ठिकाण वाळीव पोलीस ठाण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या वेळी वसई पोलीस ठाण्याकडून वाळीव पोलीस ठाण्याचे फोन नंबर घेऊन तेथून सदर महिलेची माहिती मिळविली. ही महिला फेबु्रवारी 2020पासून मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्याकडे असल्याचे कळाले. तेथूनच सदर महिलेच्या मुलाचा फोन नंबर प्राप्त करून त्याच्याशी रेवदंडा पोलिसांनी संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. अशा प्रकारे सदर महिलेस तिच्या मुलाच्या ताब्यात देऊन मायलेकाची भेट घडवून आणण्याचे पुण्यकर्म रेवदंडा पोलिसांनी केले.