Breaking News

काँग्रेसचा जाहीरनामा पवारांना मान्य आहे का?

गोंदिया : प्रतिनिधी

काँग्रेसने निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा आणि जवानांचा अपमान करणारा असल्याने हा जाहीरनामा राष्ट्रवादीचे नेते माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना मान्य आहे का, असा खडा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदियाच्या जाहीर सभेत केला.

गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून केली. कसे आहात, गोंदियावासीयो, आज मी पुन्हा तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रात आलो आहे, अशी भाषणाची मराठीतून सुरुवात करीत मोदींनी गोंदियावासीयांची मने जिंकली. तीन राज्यांचा प्रचार दौरा केला, पण गोंदियातील सभा प्रचंड झाली असाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

मागील वेळी 2014मध्ये आमच्या हातात सत्ता दिली, पण यूपीए सरकारने केलेल्या चुका सुधारण्यात पाच वर्षाचा काळ गेला. आता मात्र पुढील पाच वर्षात आपले सरकार आक्रमकपणे सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. मोदींनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही कडाडून टीका केली.

काँग्रेसचा जाहीरनामा हा देशविरोधी असून, हा जवानांचा अपमानच असल्याचेही त्यांनी सुचित केले. या जाहीरनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सहमत आहेत का, ज्यांनी या देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषविलेले आहे, त्या पवारांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचे आक्रमक भाषण

या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमकपणे भाषण करीत राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. या पक्षाच्या कॅप्टननेच निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी त्यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना नवभारताच्या निर्मितीसाठी मोदींना साथ द्या, असे आवाहन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply