लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
गव्हाण : रामप्रहर वृत्त
खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. त्यांनी मागील पाच वर्षात केलेली कामे घेऊन आणि जिंकण्याचा विश्वास घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा, असा सल्ला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मावळ मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी सभा प्रचार सभा झाली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजप आणि शिवसेना ही एकत्र निवडणूक लढत असल्याने पनवेलमध्ये 40 ते 50 हजार मतांची आघाडी श्रीरंग बारणे यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, सल्लागार बबनदादा पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, उलवे नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, युवा नेते साईचरण म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संसदरत्न प्राप्त झालेले आदर्श असलेले व्यक्तिमत्त्व खासदार श्रीरंग बारणे आणि दुसरीकडे नवखा असा उमेदवार ज्याला बोलता येत नाही. खरं म्हणजे ज्याला वर्गाचा मॉनिटर कोणी बनवणार नाही अशी स्थिती आहे. या दोघांमधील निवड आपल्याला करायची आहे आणि ही निवड करत असताना कार्यकर्त्यांनी बेसावध न राहता श्रीरंग बारणे यांचे काम तळागाळा पर्यंत पोहचवायचे आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
आमदार मनोहर भोईर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आजवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जीएसटी हा त्यातला एक चांगला निर्णय आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची गंगाजळी देशाच्या तिजोरीत आली आहे. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी 56 उमेदवार आहेत, पण महायुतीकडे केवळ एकच 56 इंच छातीचा उमेदवार आहे. खासदार बारणे यांना रायगडमधून मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.