35 दिवसांत केले नूतनीकरण; रुग्णांना दिलासा
माणगाव ः प्रतिनिधी
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांंचे निदान करणारी यंत्रणा शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड 19करिता सुसज्ज करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचना केली होती. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास जबाबदारी देत या विभागाने 35 दिवसांत कोविड 19साठी सुसज्ज रुग्णालय करून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता केंद्राच्या सूचनेप्रमाणे शासनाने जिल्ह्याजिल्ह्यात कोरोनो रुग्णांचे निदान होण्याकरिता यापूर्वी तयारी केली होती. रायगड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय अलिबाग, महाड व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे अशीच तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालय इमारतीची दुरुस्ती करणे आवश्यक होते. ही इमारत खूप खराब झाल्याने शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजे 90 लाख रुपये निधी तातडीने उपलब्ध करून या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यास सार्वजनिक विभागाने तयारी दर्शविली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बी. एन. बहीर, उपकार्यकारी अभियंता पी. एस. राऊत, शाखा अभियंता एस. एस. उलागडे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौतम देसाई, डॉ. इंगावले यांनी कंत्राटदाराकडून 35 दिवसांत उपजिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही इमारतींचे नूतनीकरण करून कोविड 19साठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केले.
या संकटकाळात सर्व प्रकारची दुकाने बंद असताना आणि कामगार उपलब्ध नसतानासुद्धा राष्ट्रीय कर्तव्य समजून कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय 100 खाटांचे असून त्यामध्ये 50 कोविड रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही इमारतींचे नूतनीकरण केले असून या इमारतींमधील ऑपरेशन थिएटर, वॉर्ड रूम, स्वयंपाकगृह, शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच कोविड 19साठी स्वॅब तपासणी रूम, कोरोनो रुग्णांकरिता वॉर्डमध्ये फेब्रिकेशनमध्ये स्वतंत्र रूम असणारे आयसोलेशन केंद्र तयार केले आहे. या रुग्णालयाची ड्रेनेज यंत्रणा व संरक्षक भिंतदेखील नवीन करण्यात आली आहे.