जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
शेतकरी आंदोलनावरून राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाकारण घेरण्याचा प्रयत्न केला. परिणामी भाजपकडूनही राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभेतील राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करीत ढोंगीपणाचा आरोप केला आहे. तुम्ही आधीची भूमिका आता का बदलत आहात, असा सवाल करून आता ढोंगबाजी चालणार नाही. देशातील जनतेने तुमचा दुटप्पीपणा पाहिलाय, असेही नड्डा यांनी या वेळी सुनावले.
नड्डा यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी आधी काय भूमिका घेतली होती ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना अमेठीतील बटाटा उत्पादक शेतकर्याचे उदाहरण देत त्यांना आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे. दलालांचे वर्चस्व संपले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.
आता सरकार नव्या कृषी विधेयकांच्या माध्यमातून तीच भूमिक घेत असल्याचे नड्डा यांनी सांगितले आहे. आता केवळ राजकारण करण्यासाठी तुम्ही दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातील जनता तुम्हाला चांगली ओळखून आहे. आता खोटारडेपणा करू नका, असेही त्यांनी राहुल गांधी यांना बजावले आहे.