Breaking News

नव्या वर्षासाठी नवी दिशा

कोरोना महामारीच्या संकटामुळे अनंत अडचणींनी व परिणामी नैराश्याने झाकोळून गेलेले 2020 साल चार दिवसांतच मागे पडणार आहे. वर्षअखेरीस देशातील कोरोना संदर्भातील परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यामुळे आपण सारेच येणार्‍या 2021 सालाकडे सकारात्मकतेने आणि आशेने पाहात आहोत. सरणार्‍या वर्षातील आपल्या अखेरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याचा उल्लेख करून देशवासियांना नव्या वर्षात जगण्याची नवी उर्मी, नवी दिशा दिली आहे. कोरोनारूपी महासंकटामुळे आपल्यापैकी प्रत्येकानेच व्यक्तिगत पातळीवर नवे धडे घेतले आहेत. राष्ट्रीय पातळीवर आपण हे संकट परतवून लावू शकलो ते एकजुटीच्या सामर्थ्यामुळे यावर मोदीजींनी पुन्हा एकदा भर दिला. एकीच्या सामर्थ्यातूनच आपल्यामध्ये आत्मनिर्भरतेचा विश्वास निर्माण झाला आहे असे सांगत त्यांनी तमाम देशवासियांना नव्या वर्षानिमित्त देशाकरिता एक निर्धार करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाने दिवसभरात वापरात येणार्‍या सर्व वस्तूंची यादी बनवायची असून यात कोणत्या विदेशी बनावटीच्या वस्तूंवर आपण अकारण अवलंबून आहोत ते शोधायचे आहे. या विदेशी वस्तूंचे देशी पर्याय शोधून त्यांचा वापर करण्याचे मोदीजींनी केलेले आवाहन निश्चितच प्रत्येकाने अंमलात आणावे असेच आहे. सर्वसामान्यांना हे आवाहन करतानाच देशी उत्पादनांची विश्वासार्हता वाढवा असे भारतीय उद्योजकांना सांगायला मोदीजी विसरलेले नाहीत. देशात अनेक ठिकाणी कित्येक नागरिक मुक्या प्राण्यांना अन्न, निवारा मिळवून देण्यासाठी अतिशय निरपेक्ष भावनेने काम करीत आहेत आणि हे सारेच अभिनंदनास पात्र आहेत याकडे मोदीजींनी लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटकाळात अनेक उच्चभ्रूंनी अतिशय निर्दयतेने आपल्या पाळीव कुत्र्या-मांजरांना रस्त्यावर सोडून दिले. त्याच समाजात असीम संवदेनशीलतेने काही जण मुक्या प्राण्यांचा सांभाळ करीत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. देशातील अनेक तरुणांमध्ये कॅन डू हे स्पिरिट दिसते. स्वयंप्रेरणेने पुढे सरसावून आदर्शवत वाटणारे काम हे तरुण करीत आहेत याचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. कर्नाटकात एका प्राचीन शिवमंदिराचा निरनिराळ्या व्यवसायात असणार्‍या काही तरुणांनी कसा कायापालट केला त्याचे उदाहरण या वेळी मोदीजींनी दिले. आठवड्याच्या अखेरीस एकत्र येऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करणार्‍या या तरुणांमुळे स्थानिकही मग त्या कामात योगदान देण्यास पुढे आले. अशाच तर्‍हेचे प्रेरणादायी काम लॉकडाऊनच्या काळात देशभरातील असंख्य शिक्षकांनी केले आहे. ऑनलाइन शिक्षण देताना विविध प्रकारचे कोर्स मटेरिअल तयार करून विद्यार्थ्यांना प्रभावी पद्धतीने शिकवण्याचा प्रयास ज्या-ज्या शिक्षकांनी केला आहे, त्यांनी आपली आगळी पद्धती केंद्र सरकारच्या शिक्षण विभागास जरुर कळवावी. देशाच्या दूरगामी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या कामी तिचा उपयोग होऊ शकेल, असे मोदीजींनी म्हटले आहे. वयाच्या 86व्या वर्षी कॉम्प्युटर वापराचे शिक्षण आत्मसात करून 96व्या वर्षी संगणक वापरातून पुस्तक लिहिणार्‍या दक्षिणेतील एका वेदाचार्यांचाही मोदीजींनी उल्लेख केला. जोवर जिज्ञासा, तोवर जीवन असे सांगत सतत नवीन शिकत राहण्याची प्रेरणाही मोदीजींनी दिली. कोरोना काळात काहिसे दुर्लक्ष झाले असले तरी येत्या 2021 मध्ये देशाला सिंगल युझ प्लास्टिकपासून मुक्त करायचे आहे, असे बजावत त्यांनी आपल्या मन की बातचा समारोप केला. वर्षअखेरीस मोदीजींनी जनतेशी साधलेला हा संवाद निश्चितच नव्या वर्षाला नव्या उमेदीने सामोरे जाण्याकरिता आवश्यक ती प्रेरणा देणारा होता.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply