Breaking News

चौकातले भाषण!

माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तासभराच्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. यावेळी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण भारतातील राज्ये, उत्तर भारतातील राज्ये, गुजरात अशा अनेक देश आणि प्रांतांमधील उदाहरणे दिली. परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेमुर्वतपणे केलेल्या वीजतोडण्या, कोविड केंद्रांमधील भ्रष्टाचार, संजय राठोड प्रकरण अशा कुठल्याही मुद्द्याला हात लावला नाही. एका अर्थी मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फक्त आणि फक्त राजकारण भरले होते. त्यात महाराष्ट्र कुठेच नव्हता.

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषणात सरकार पक्षाला मंगळवारी विधानसभेमध्ये अक्षरश: गारद केले. माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे चांगलाच रंग भरला होता. परंतु याच प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जे भाषण केले, ते निव्वळ चौकातले भाषण ठरावे. त्या भाषणात ना अभ्यास होता, ना सामान्य जनतेबद्दल कळकळ. महाराष्ट्रातील समस्या पूर्णपणे विसरून मुख्यमंत्र्यांनी जुनी उणीदुणी काढण्याचा खेळ तेवढा करून दाखवला. शेतकर्‍यांच्या प्रश्नी मूळ मुद्द्यांना बगल देताना मुख्यमंत्र्यांना राजधानी दिल्ली नजीकच्या सिंघू सरहद्दीवर आंदोलनासाठी बसलेल्या पंजाबच्या शेतकर्‍यांचा कळवळा आला. या शेतकरी बांधवांनी राजधानीत शिरू नये म्हणून रस्त्यावर खिळे पसरल्याबद्दल त्यांनी केंद्रसरकारवर सडकून टीका केली. आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचे वीज-पाणी बंद केल्याबद्दल त्यांनी धिक्कार केला. सिंघू सरहद्दीवरील शेतकर्‍यांची वीज कापल्याबद्दल संतापलेल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या सरकारनेच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या वीजेच्या जोडण्या बिले न भरल्याबद्दल कापल्या आहेत याचे विस्मरण झाले. एखाद्या नेत्याने प्रचारसभेमध्ये तासभराचे भाषण करावे तसे हे भाषण झाले. त्यात महाराष्ट्राच्या भल्याचा अंश मात्र आशय नव्हता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेरील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील न्यूनत्व अचूक पकडले. यावेळी फडणवीस यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करून दाखवाच असे खुले आव्हान महाविकास आघाडी सरकारला दिले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे ठेवण्याची हिंमतच या सरकारमध्ये नाही. तसेच पुण्यात येऊन हिंदू धर्माबद्दल गरळ ओकून गेलेल्या शरजिल उस्मानीच्या मुसक्या आवळण्याची देखील या सरकारमध्ये ताकद नाही असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे बदललेले रूप पाहता फडणवीस यांच्या टीकेमध्ये तथ्य आहे हे कोणीही सांगेल. सत्तेसाठी शिवसेना कुठल्याही थराला जाऊ शकते. फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मंगळवारी आकडेवारीनिशी अत्यंत अभ्यासपूर्ण असे भाषण केले होते. सुमारे पावणे दोन तासाच्या या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यातील एकाही मुद्द्याला सयुक्तिक उत्तर देणे महाविकास आघाडी सरकारला शक्य झाले नाही. खरे सांगायचे तर महाविकास आघाडीकडे फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरेच नाहीत. म्हणूनच जुनी उणीदुणी काढणे, यमके जुळवत पोरकट टीका करणे, प्रसंग पाहून जमल्यास विरोधीपक्षाची हेटाळणी करणे या पलिकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना काही करण्याजोगेच उरलेले नाही. कायदा सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न, अर्थचक्राला गतिमानता देण्याचे प्रयत्न किंवा कोविड साथ रोगाची हाताळणी या महत्त्वाच्या आघाड्यांवर महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply