Breaking News

सुस्वागतम् 2021

कोरोनाच्या साथीमुळे सरत्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली. त्यात आपला देश आणि महाराष्ट्रदेखील अपवाद नव्हता. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचे जहाज यशस्वीरित्या किनार्‍याकडे हाकारले आहे. येत्या वर्षभरात असेच काही महासंकट न उद्भवल्यास देशाची अर्थव्यवस्था मूळ पदावर नक्की येईल असा विश्वास वाटतो.

सरते वर्ष कसेही गेले असले तरी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मनात उमेद आणि उत्साह जागतोच. एरव्ही यंदाच्या या नव्या वर्षाचे स्वागत प्रचंड जल्लोषाने झाले असते. दरवर्षी देशोदेशी नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष आपापल्या संस्कृतींनुसार केला जातो. भारतीय पंचांगाप्रमाणे आपले वर्ष खरे तर पाडव्याच्या दिवशी सुरू होते. परंतु आता भारतीयांनीदेखील सौर पंचांग आपलेसे केल्यामुळे 31 डिसेंबरची रात्र ही देशभर जल्लोषात साजरी केली जाते. यंदा मात्र मर्यादांनिशी जल्लोष करणे भाग होते. अर्थात तरीही मनोमनी दाटून आलेली उमेद आणि उत्साह मात्र नेहमीचाच होता. अंधाराचे जाळे आता फिटू लागले आहे. परंतु आकाश मात्र अजून पुरेसे मोकळे झालेले नाही. अर्थात संकट अजून टळलेले नाही याची जाणीव जबाबदारीने ठेवणे भागच होते. कोरोना महामारीचा प्रभाव थोडासा कमी झाल्यासारखा दिसत असला तरी सावधगिरीचा कालखंड इतक्यात संपेल अशी चिन्हे नाहीत. साडेसातीचा शेवट नेहमी गोड होतो असे मानले जाते. त्या श्रद्धेनुसार म्हणायचे झाले तर सरत्या वर्षाने जाता-जाता दोन चांगल्या बातम्या दिल्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अवलक्षणी मानल्या गेलेल्या सरत्या वर्षातच कोरोना विषाणू प्रतिबंधक लशीचा शोध लागला. खरे तर वैज्ञानिकांचा हा पराक्रम सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आहे. इतक्या कमी अवधीमध्ये आजवर कुठल्याही आजारावरील प्रतिबंधक लस शोधता आलेली नाही. कोरोना विषाणू प्रतिबंधक लस मात्र जेमतेम वर्षभरात शोधून काढण्याचा विक्रम शास्त्रज्ञांच्या नावावर नोंदला गेला. परिणामकारक लसीच्या संशोधनासाठी वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. परंतु जीवशास्त्र, शरीरशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा अनेकविध शास्त्रांना कामाला लावून मानवाने महासंकटावरील उपाय अखेर शोधून काढलाच. ज्या वर्षामध्ये इतका क्रांतिकारक शोध लागतो, त्या वर्षाला अशुभ किंवा अवलक्षणी कसे म्हणावे? सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच कोविशिल्ड या भारतीय बनावटीच्या लसीला मान्यता मिळाल्याचे शुभवर्तमान आले आहे. भारतीय बनावटीची लस पूर्णत्वाला गेली असून लवकरच राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात होईल. किंबहुना, आज रोजी रुजू झालेले नवे वर्ष या लसीकरणाच्या मोहिमेतच व्यतीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ आणि डोळस नेतृत्वाच्या जोरावर आपल्या देशाने कोरोना विषाणूच्या साथीला यशस्वीरित्या अटकाव केला. भल्याभल्या देशांची गाळण उडालेली असताना भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशाने मृत्यूदर आटोक्यात ठेवलाच, परंतु साथीवरदेखील नियंत्रण मिळवले. पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व लाभले नसते तर भारताची अवस्था किती कठीण झाली असती याची कल्पना न केलेलीच बरी. नवे वर्ष अनेक स्वप्ने घेऊन दाराशी आले आहे, त्याचे मन:पूर्वक स्वागत करायला हवे. एरव्ही नव्या वर्षाला कडकडून भेटत उत्साहाने त्याचे स्वागत करायला सार्‍यांनाच आवडले असते. परंतु सध्यातरी दोन हात दूर राहून नमस्कार करत सुस्वागतम् असे म्हणायला हवे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply