Breaking News

रस्त्यांच्या मधोमध विजेचे खांब

कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत,त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब हि समस्या. यावर महावितरण कंपनी कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची करोडो रुपयांची कामे करणारी यंत्रणा देखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे.

कर्जत तालुक्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे केली गेली आहेत.त्यात कर्जत शहरात आणि कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून रस्त्यांचे काम झाली आहेत. खोपोली हाळ फाटा ते कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्गावर रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. रस्ता रुंद करताना त्यावेळी रस्त्याच्या आजूबाजूला असलेले विजेचे खांब यांच्याबाजूने रस्त्याने रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी कल्याण येथून कर्जत तालुका हद्दीत येताना मुंबईला वीज वाहून नेणारा टाटा चा अजस्त्र खांब रस्त्याच्या कडेला होता, त्याच्या बाजूने रस्ता पुढे नेण्यात आला होता.नेरळ वडवली गावाजवळ रस्त्याच्या बाजूला असाच एक टाटा ची वीज वाहून नेणारा अजस्त्र खांब आहे,त्यांच्या देखील बाजूने रस्ता पुढे नेण्यात आला. कर्जत-पळसदरी मार्गे खोपोली येथे जाताना देखील किमान चार ठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेचे खांब आले आहेत. ते विजेचे खांब उभे असून कर्जत नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडच्या मार्गावर तसेच पळसदरी गावाच्या वळणावर,वर्णे आदिवासी वाडी तसेच डोलवली आणि माणकीवली या भागात विजेचे खांब आठ वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करताना उभे होते ते आजही तसेच उभे आहेत. त्यानंतर या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम राज्य शासनाने हायब्रीड तत्वावर सुरु केले आहे, मात्र या मधल्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने विजेचे खांब हलविण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आजही कर्जत तालुक्यातील खोपोली-कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत विजेचे खांब उभे असून ते हलविण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण कंपनी यांच्याकडून करण्यात आली नाही,परिणामी ते विजेचे खांब हे वाहनचालक यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत.

कर्जत शहरात नगरपालिकेच्या हद्दीत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या आर्थिक मदतीने शहरातील बहुतेक सर्व रस्त्यांची कामे होत आहेत. अपवाद वगळता कर्जत शहरातील सर्व रस्ते आरसीसी कोंक्रोटचे बनले आहेत. त्या सर्व रस्त्याची मागील दहा वर्षांपासून सुरु झालेली कामे आज देखील सुरु आहेत. पण कर्जत शहरातील अनेक रस्त्यांवर त्यानंतर देखील उभे असलेले विजेचे खांब आजही उभे आहेत. शहरातील बाजारपेठ भागात उभे असलेल्या खांबांना आतापर्यंत अनेकांची वाहने धडकली आहेत. त्यानंतर पाच वर्षे नगरसेविका म्हणून त्या सर्व खांबांबाबत आवाज उठविणार्‍या सुवर्णा जोशी या कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष झालायने त्यांनी त्या विजेच्या खांबांसाठी स्वतः लक्ष घालून ते वीजवाहक खांब हटविण्याची कार्यवाही सुरु केली आहे. ते खांब अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम पालिकेकडून महावितरण कंपनी ला देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जत शहरातील प्रामुख्याने बाजारपेठ भागात असलेले विजेचे खांब हटविण्याची कार्यवाही नजीकच्या काळात अपेक्षित आहे,पण विजेचे खांब हटवायला 10 वर्षे लागतात का? असा प्रश्न  समोर येत असून रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना पालिकेने ते खांब हालवुन रस्त्यांची कामे करणे आवश्यक होते.

आता तालुक्यात कर्जत-मुरबाड या नव्याने बनलेल्या शहापूर-जेएनपिटी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या रस्त्यावर रुंदीकरणाची आणि काँक्रिटीकरण कामे राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी हाती घेतली आहेत. त्यात कळंब पासून वारे गावाच्या हद्दीत किमान चार ठिकाणी रस्त्यात विजेचे खांब आडवे येत आहेत. त्याचवेळी वारे पासून कशेळे पर्यंत आणि कशेळे पासून कडाव या भागात हीच स्थिती असून रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब हि मोठी समस्या या रस्त्याने प्रवास करणार्‍या वाहनचालक यांच्यासाठी कळीचा मुद्दा बनली आहे. त्याचवेळी कर्जत पर्यंत हा रसता येत असताना देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला विजेचे खांब असून ते हटविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि आता राज्य रस्ते विकास महामंडळ यांची असून देखील रस्त्यांची कामे करणारे एजन्सी यांच्याकडून  करून घेण्यात शासकीय यंत्रणा कमी पडत आहे.नेरळ गावातील रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेने रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून घेतले आहे. मात्र रस्त्याची कामे होऊन दोन वर्षे उलटली तरी नेरळ गावातील रस्त्यात उभे असलेले विजेचे खांब हटविले गेले नाहीत. बाजारपेठेत उभे असलेले विजेचे खांब हे कधी हटविणार?ते खांब हटविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कधी निधी देणार हा प्रश्न कायम आहे.

मात्र रस्त्यात आणि रस्त्याच्या बाजुला उभे असलेले विजेचे खांब हि रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या वाहनचालक यांच्या जीवावर बेतणारी असल्याचे स्पष्ट दिसत असून देखील बांधकाम विभाग ते खांब हटविण्याची कार्यवाही करीत नाही. विजेचे जे ख्म्बा रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या आजूबाजूला उभे आहेत, त्या खांबांवरून मुख्य वीज वाहिन्या वीज वाहून नेण्याचे काम करतात. त्याचवेळी काही ठिकाणी तर टाटा ची वीज वाहून नेणारे खांब उभे आहेत. त्यातील कोणत्याही खांबाला वाहनांची धडक बसल्यास तेथे वीज वाहक तारांमुळे मोठा स्फोट होऊ शकतो. ही भीती लक्षात घेऊन शासनाने संबंधित यंत्रणा यांना आदेश देऊन रस्त्यावर असलेले विजेचे खांब हटवावे अशी सातत्याने मागणी होत असते.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply