Breaking News

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई : प्रतिनिधी

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये उफाळून आला आहे. शिवसेनेकडून वारंवार नामांतराची मागणी केली जात आहे, तर काँग्रेसकडून त्यास सातत्याने विरोध दर्शविला जात आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेवरून टोला लगावला आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हा ढोंगीपणा नाही तर काय, असा सवाल शिवसेनेला केला आहे. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत!; शिवसेना नेते संजय राऊत यांचा काँग्रेसला टोला

औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेकडून सातत्याने भूमिका मांडली जात आहे. औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणे ‘सेक्युलर’ नव्हे, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दै. सामनामधील रोखठोक सदरातून काँग्रेसला टोला लगावला आहे. नामांतराला विरोध असलेल्या काँग्रेसवर संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून टीका केली आहे. राऊत यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील सर्वच पुढार्‍यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठित राज्यविस्तार करायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानत व तो ते अमलात आणत. त्याने शिवरायांना तर शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींनाही हाल हाल करून मारले. हा औरंगजेब संभाजीराजांच्या बलिदानानंतरही 25 वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला आणि शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान, पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे, असे म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला टोला लगावला आहे. याचबरोबर नामांतराच्या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो, पण निर्णय घेण्यात आला आहेे.

मतांची पोळी भाजण्यासाठी आदर्शाचा वापर करणार नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची शिवसेनेवर टीका

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलरवादा वरून काँग्रेसला टोला लगावला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत औरंगाबादच्या नामांतरावरून टीका केली आहे. थोरात यांनी ‘सामना’तील राऊतांच्या लेखाला ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. नामांतराचे राजकारण केले जात आहे. हा ढोंगीपणा नाही, तर काय आहे, असा सवाल थोरात यांनी शिवसेनेला केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्यांनी खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे, मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागत आहे. नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा आहे, असे थोरात म्हणाले. राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा!  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणार्‍यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करीत असेल, तर त्याला कडाडून विरोध करू, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply