तहसीलदारांचे कारवाईचे आश्वासन
कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने करण्यात येणारे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी कर्जत नाभिक समाज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. ही मागणी मान्य न झाल्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून उपोषण सुरू करण्यात आले होते, मात्र तहसीलदारांनी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
कर्जत नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर 144/19मध्ये गैरमार्गाने सुरू असलेल्या बांधकामाबाबत तहसील कार्यालयाकडे विविध तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. तरीदेखील गेल्या दोन वर्षांत अधिकारी आणि घोटाळा करणार्या व्यक्तींविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही, तसेच कर्जत नगरपालिका मुख्याधिकार्यांनीदेखील मैदान म्हणून वापरण्यास दिलेल्या जागेवर बांधकामाचा आराखडा मंजूर केल्याबाबत अहवाल दिलेला आहे. त्यानुसार शर्थभंग झाल्याचे वस्तुनिष्ठ पुरावे शासनाकडे प्राप्त झाले आहेत. असे असतानाही जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले होते. 1 जानेवारी 2021पर्यंत सदर जमिनीवरील बांधकाम थांबवण्याबाबत आणि जमीन शासनजमा करण्याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
कर्जतमधील नाभिक समाज बांधवांची दुकाने बेमुदत काळाकरिता बंद ठेवून संस्थेच्या वतीने कर्जत येथील टिळक चौक येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. राहुल कोकरे व हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा संघर्ष समितीचे अॅड. हृषिकेश जोशी उपोषणास बसले होते. रात्री तहसीलदार विक्रम देशमुख आणि पोलीस निरीक्षक अरुण भोर उपोषणस्थळी आले. त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व 15 दिवसांत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असे सांगितले, परंतु उपोषणकर्त्यांनी ते मान्य न करता 10 दिवसांची मुदत द्यावी, असे सांगितले. ते मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले, मात्र योग्य ती कारवाई न झाल्यास 26 जानेवारीपासून पुन्हा उपोषण करण्यात येईल, असे हृषिकेश जोशी यांनी जाहीर केले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, पंचायत समिती सदस्य नरेश मसाणे, नगरसेवक बळवंत घुमरे, किरण ठाकरे आदी उपस्थित होते.