सांगली ः प्रतिनिधी : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापार्यांनी करून या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा लेख आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी हा लेख शोधून काढला आहे. या लेखाने जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेण्या, त्यांची कामगिरी, जैनधर्मियांचे स्थान यांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील हा सर्वांत जुना हळेकन्नड शिलालेख ठरला आहे.
खानापूर तालुक्यातील भाळवणी हे प्राचीन काळापासून प्रसिध्द गाव आहे. कल्याणीहून राज्य करणार्या चालुक्य राजांची भाळवणी ही उपराजधानी होती. हे गाव एक प्रमुख व्यापारी पेठ होते. अनेक प्रसिध्द व्यापारी या गावात राहत असत. गावातील नागरिकांनी आणि व्यापार्यांनी गावात मोठी मंदिरे बांधल्याचे उल्लेख आहेत. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी आणि एक देवनागरी शिलालेख सापडला होता. त्यापैकी दोन चालुक्यकालीन, तर एक यादवनृपती दुसरा सिंघण याच्या काळातील आहेत. हे सर्व शिलालेख सध्या कराड येथे आहेत, मात्र सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे.
भाळवणी गावच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करीत असताना मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना भाळवणी गावात हळेकन्नड लिपीतील एक शिलालेख आढळून आला. या शिलालेखाचे ठसे घेऊन त्यांचा गेली वर्षभर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासांती जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक निष्कर्ष समोर आले. सदर शिलालेख हा जुन्या कन्नड लिपीत आहे.