भाजप नेते देवेंद्र साटम यांचे प्रतिपादन; श्रीरंग बारणे यांचा खालापूर तालुक्यात प्रचार दौरा
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
काँग्रेसने 50 वर्षे देशावर सत्ता उपभोगताना जेवढी कामे केली, त्यापेक्षा अधिकपटीने कामे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच वर्षात यशस्वीपणे करून दाखविली असल्याने देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा भाजपच्याच हाती सत्ता सोपवा, असे आवाहन माजी आमदार देवेंद्र साटम यांनी येथे केले.
शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि. 3) खालापूर तालुक्याचा प्रचार दौरा केला.
या दौर्यात खासदार बारणे यांनी देवन्हावे, खानाव, खालापूर आदी ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या.
बैठकीसाठी उरणचे आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, हनुमंत पिंगळे, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, मंगेश पाटील, नरेश गायकवाड, रेखा ठाकरे, महेश भोईर, उल्हास भोरके, संतोष भोईर, संतोष विचारे, नवीनचंद्र घाटवळ, रेश्मा घोगरे, गोविंद बैलमारे आदी उपस्थित होते. या वेळी भरत पाटील, दिलीप मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षात स्वागत केले. उंबरे (ता. खालापूर) ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. तेथील सरपंच देवयानी प्रशांत साळुंखे, उपसरपंच दिव्या दिलीप विचारे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. देवेंद्र साटम पुढे म्हणाले की, देशाला नवीन पर्व देणारी निवडणूक म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. देशाच्या समस्या, आव्हाने माहिती असणारा, विकासाचा ध्यास असलेला उमेदवार लोकसभेत निवडून जायला हवा. त्यासाठी श्रीरंग बारणे यांना या वेळीही विजयी करा. शिवसेनेचे संपर्क प्रमुख दत्ता दळवी, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांनीही या वेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
एनडीए सरकारच्या काळात रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानाचे जाळे, धरणे, वाहतूक दळणवळण, आधुनिक शेती, असे अनेक प्रकल्प देशभर सुरू आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील काही वर्षात जगभर प्रवास केला. त्याचे फलित म्हणजे भारतावर हल्ला झाल्यानंतर ते सगळे देश भारताच्या सोबत उभे राहिले. त्यामुळे देशाचे रक्षण करणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख जगात आहे.
-माजी आमदार देवेंद्र साटम
खासदार म्हणून काम करताना आपण सर्वसामान्य माणसाला न्याय दिला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी चर्चा केली. भ्रष्टाचाराने बरबटलेला राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्यासमोर मते मागत आहे, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
-श्रीरंग बारणे, उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघ
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत.
-मनोहर भोईर, आमदार, उरण