Breaking News

रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

माणगाव : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, खोपोली, माणगाव, पनवेलच्या धोदाणी गावामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. 7) सकाळपासून ढगाळ वातावरण होते त्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली. या अवकाळी पावसाचा फटका शेतकर्‍यांसह परिसरातील वीटभट्टीधारकांना देखील बसला आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश झोडपून काढले, या वेळी वीजपुरवठा तालुक्यातील खंडित झाला होता. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर बाजार पेठेतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच झोप उडवून टाकली.

या अवकाळी पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आंबा काजू व अन्य फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कडधान्याचा घास हाता तोंडाला आलेला हिरावून घेतला. फळभाज्या टोमॅटो, मुळा, गवर, वांगी, मिरची, कारली, घोसाळी यासारखी पिके जमीन दोस्त केली.

त्याचबरोबर बदलापूरमध्येदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने बुधवारी वर्तवला होता. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, मागील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

माणगावमध्ये प्रचंड नुकसान

माणगाव तालुक्यात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतो. हे पीक जमीनदोस्त झाल्याने त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले आहेत. तर विट उत्पादकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्यामुळे तो ही अधिकच कर्जबाजारी झाला आहे.  सुमारे सव्वा तास पडलेल्या या मुसळधार पावसाने माणगाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता.

खालापुरात नववर्षाच्या पाऊसखुणा

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली, खालापुर,  वावोशी, रसायनी परिसर गुरूवारी (दि. 7) अवकाळी पावसाने ओलाचिंब झाला. कुठे हलक्या सरी तर कुठे धुवांधार पाऊस कोसळला. रस्त्यावर पाणी साठले तर खड्डे, नदीचे कोरडे झालेले पात्र पुन्हा वाहू लागले.

नववर्षामधला हा पहिलाच पाऊस असून या अवकाळी पावसाने त्याच्या खुणा कुठे चांगल्या कुठे वाईट करून ठेवल्या. अवकाळी पावसाने विटांचा तुकडा झाल्याने खालापूर तालुक्यातील विटभट्टी  मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply