श्रीवर्धन : प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण झाले आहे. शुक्रवारी सकाळी जवळजवळ दोन तास रिमझिम पर्जन्यवृष्टीदेखील झाली. या झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील आंबा व काजूच्या बागायतदारांना चिंता लागली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे, कारण शेतकर्यांनी भात कापणीनंतर आपल्या शेतात लावलेली उडीद, मूग, चवळी, वाल इत्यादी कडधान्याची पिके वाया जातील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी निसर्ग चक्रीवादळाने आंबा व काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागायतदारांची आंब्याची व काजूची झाडे पूर्णपणे बुंध्यातून उखडून निघाली आहेत. त्यातच मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम झालेल्या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार खूपच चिंतातुर झाले आहेत. डिसेंबर-जानेवारीत पडणार्या खूप थंडीमुळे आंबा-काजूच्या झाडांना चांगल्याप्रकारे मोहोर येतो. वातावरण स्वच्छ असल्यामुळे मोहोर हवेत असलेल्या गारव्यामुळे करपून जात नाही, किंवा गळूनदेखील पडत नाही. परंतु ढगाळ वातावरण झाल्यानंतर झाडांना आलेला मोहोर करपुन जाऊन गळून पडतो. ढगाळ वातावरणामुळे श्रीवर्धन तालुक्यातील थंडीदेखील गायब झाली आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांना उकाडा जाणवत आहे. हवामान विभागाकडून बदलत्या वातावरणाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती शेतकर्यांना देण्यात येत नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.