Breaking News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्पर्धा विश्व अॅकॅडमीमध्ये अभिवादन

अलिबाग : रामप्रहर वृत्त

येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अ‍ॅकॅडेमीचे विद्यार्थी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी यांनी स्त्रीदास्यत्वाचा इतिहास, सद्यःकालीन महिला वर्गाची परिस्थिती आदीं मुद्यांवर प्रकाशझोत टाकल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचे दाखले देत स्त्रीवर्गाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.

सखी वन स्टॉप केंद्राच्या प्रशासक मोहिनी रानडे यांनी महिला वर्गासाठी असणार्‍या सुरक्षा प्रणाली आणि त्यांची महिला सुरक्षितेत भूमिका यांची माहिती दिली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय निशांत रौतेला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचे महत्व अधोरेखित करून फुले दांपत्याने शिक्षणकार्याद्वारे साधलेल्या सामाजिक प्रगतीचा आलेख उपस्थितांपुढे मांडला.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाटील यांनी केले.

प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नागडोंगरी अंगणवाडी शिक्षिका नीता गोंधळी, सखी वन स्टॉप केंद्राच्या समन्वयक सुकन्या जंजिरकर, समुपदेशक स्वाती म्हात्रे, आयटी अ‍ॅडमिन सारिका पाटील यांच्यासह स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमीचे बहुतांश विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply