आमदार महेश बालदी यांचा विश्वास
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, म्हातवली व नागावमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 11) मोठे नागाव येथील पोखरण मैदानात भव्य सभा झाली. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार, असा विश्वास या वेळी आमदार बालदी यांनी व्यक्त केला.
या सभेला भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, नगरसेवक राजू ठाकूर, नगरसेविका स्नेहल कासारे, उमेदवार कस्तुरी भोजने, अश्विनी ससाणे, राकेश म्हात्रे, पल्लवी म्हात्रे, रिमा शिरधनकर, महेश घरत, वर्षा ठाकूर, स्मिता येरुणकर, भूपेंद्र घरत, विनया ठाकूर, शैलेश माळी, राकेश म्हात्रे, महेश घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार महेश बालदी म्हणाले की, नागाव, म्हातवली या ग्रामपंचायतींचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. येथील नागरिकांना चांगले रस्ते, गार्डन, गटारे आदी सोयीसुविधा आम्ही देऊ. ओएनजीसीच्या सीएसआर फंडातून पीरवाड समुद्र किनार्याचा विकास केला जाईल, तर येत्या काही दिवसांत नागावमध्ये पाईपने गॅस पुरविला जाणार आहे. या वेळी कर्नाळा बँक घोटाळ्यावर बोलताना आमदार बालदी यांनी घोटाळा करणार्यांना लवकरच अटक होईल, असे सांगितले.