कर्जत : बातमीदार
मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही गेले पाच दिवस माथेरानमध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. एमजेपीच्या अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
शारलोट तलाव व नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा बंद आहे तर वीज पुरवठ्याचे कारण पुढे करून शारलोट तलावामधून होणार्या पाणी पुरवठ्यात चालढकलपणा होत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे. पाणी नसल्याने येथील स्थानिकांसह दुकानदार हवालदिल झाले आहेत. पाणी नसल्याने काही व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली आहेत तर महिलांमध्ये पाणी पुरवठा अधिकार्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माथेरान बाजार पेठेतील माझ्या रेस्टॉरंटमध्ये गेले पाच दिवस पाणी आले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी येथील एमजेपीच्या कार्यालयात गेलो असता कोणीही अधिकारी हजर नव्हता. आम्हाला वाणिज्य दराने पाणी मिळते. मात्र प्रत्यक्षात पाणी मिळत नसतानाही आम्ही बिल का भरावे? अशी स्थानिक रेस्टॉरंट मालक अरविंद शेलार यांची तक्रार आहे.
नेरळ कुंभे येथील योजनेतून माथेरानला पाणी पुरवठा केला जातो. या योजनेत नेरळ ते जुम्मापट्टी, जुम्मापट्टी ते वॉटर पाइप आणि वॉटर पाइप ते माथेरान अशा तीन टप्यात पंप आहेत. त्यातील काही पंप नादुरुस्त झाले आहेत, ते दुरुस्त करून आणले असून माथेरानाला सुरळीत पाणी पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-पांडुरंग पाटील, शाखा अभियंता, एमजेपी माथेरान