Breaking News

देशात सुपरफास्ट 5जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ

भारताने नवा इतिहास रचला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावेल. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता, पण 5जीने भारताने एक नवा इतिहास रचला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 1) येथे केले. ते 5जी सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित कार्यक्रमात देशातील 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी संबोधित करताना त्यांनी 5जीचे फायदे आणि ही सेवा भारतात कशा प्रकारे क्रांती घडवून आणेल यावर भाष्य केले तसेच आजच्या तारखेची नोंद इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांत होईल, असे म्हटले. आज 130 कोटी भारतीयांना 5जीच्या रूपाने एक अद्भूत भेट मिळत आहे. 5जी नव्या युगाची दार ठोठावत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे. यासाठी मी प्रत्येक भारतीयाचे खूप खूप अभिनंदन करतो. याअगोदर देशाला बाहेरून मोबाइल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाइल निर्यात करीत आहे. मोबाइल निर्मिती करण्यात भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करून दाखवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने घरोघरी वीज पोहचवण्याची मोहीम सुरू केली होती. हर घर जल अभियानातून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याच्या मिशनवर काम केले. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीबातील गरीबांच्या घरात गॅस सिलिंडर पोहचवले. त्याचप्रमाणे आमचे सरकार सर्वांसाठी इंटरनेट या ध्येयावर काम करीत आहे. मी पाहिले आहे की, देशातील गरीब लोकदेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. आता तंत्रज्ञान खर्‍या अर्थाने लोकशाही बनले आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

5जी तंत्रज्ञानामुळे शिक्षणासह सर्वच क्षेत्रात क्रांती होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन; पनवेलमध्ये विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पनवेल ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 1) राजधानी दिल्लीतून 5जी सेवेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व 5जी सेवेचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकींग यासह सर्वच क्षेत्रांत 5जी तंत्रज्ञानामुळे क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. नवीन पनवेल पोदी येथील शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहरक्षक-नागरी संरक्षण दल अपर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक गणेश पाटील, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपिनकुमार सिंह, आयुक्त डॉ. जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका सुशीला घरत आदी उपस्थित होते. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेलसह राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचची बसण्यासाठी निवड केली. मीही तुमच्यासोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 5जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असे सांगून इंटरनेटला मिळणार्‍या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा; गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व त्यांच्या टीमचे आभार मानले. या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी 5जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज, सोप्या शब्दांत समजेल अशी माहिती दिली. या वेळी सादरीकरण करताना श्री. सिंग यांनी टेलिकॉम तंत्रज्ञानाचा वन जी ते फाइव्ह जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाइलचा वापर स्वतःच्या सुरक्षेसाठी करा. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply