लैंगिक शोषणाचा आरोप
लाहोर ः वृत्तसंस्था
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमविरुद्ध गुरुवारी (दि. 14) एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाहोर येथील सत्र न्यायालयाने पोलिसांना पाकिस्तानच्या कर्णधारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला.
कोर्टाने बाबरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्या मालिकेसाठी तयारी करीत आहे. त्याआधी कर्णधार बाबरला हा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी हमिजा मुख्तार या महिलेने बाबरवर गंभीर आरोप केले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील समावेश होता. बाबरने लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप हमिजाने केला होता. इतकेच नव्हे तर पाक कर्णधाराने आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडले, असे हमिजाने म्हटले होते. यासाठी तिने गर्भपात केल्याचे पुरावेदेखील दिले होते.
या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायाधीश नोमान मुहम्मद नईम यांनी नसीराबाद पोलिसांना बाबरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हे आरोप अधिक गंभीर आहेत. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे मत कोर्टाने व्यक्त केले. कोर्टाने बाबरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताना बाबरला हमिजा किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देता कामा नये, असे म्हटले आहे. हमिजा जेव्हा बाबरविरुद्ध नसीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात होती तेव्हा बाबरने पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन देत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता.