नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम, मात्र याव्यतिरिक्त अनेक आघाड्यांवर पोलीस काम करीत असतात. पती-पत्नीमधील वाद पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवतात. त्यासाठी पोलीस विभागात खास महिला कक्ष असतो. महिला अत्याचार, पती-पत्नी भांडणे आदी घरगुती वाददेखील सदर विभागात सोडवले जातात. त्यांचे समुपदेशन केले जाते. नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रात 2020 वर्षात अशा 633 तक्रारी या महिला कक्षाकडे आल्या होत्या. यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे मार्ग काढण्यात या कक्षाला यश आले असून, त्यांचे संसार पुन्हा सुरू झाल्याचे समाधान असल्याचे या कक्षाच्या सहाय्यक मीरा बनसोडे यांनी सांगितले. पती-पत्नीतील वादात सर्वांत मोठा अडथळा असतो तो त्यांचा अहंपणा. एकदा हा अहंपणा दूर करण्यात यश आले की अनेक वाद आपोआपच मिटतात, असेही बनसोडे यांनी सांगितले.
तक्रारींचे स्वरूप
पतीचे मद्यप्राशन, सतत भांडण, अनैतिक संबंध, सासू-सासर्यांचा त्रास, पतीच्या नातेवाइकांकडून टोमणे, स्त्री-स्वातंत्र्य आदी महिलांच्या तक्रारी असतात, तर पुरुषांच्या तक्रारींमध्ये बायको सतत मोबाइलमध्ये व्यस्त असणे, मुलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष, आईवडिलांची काळजी न घेणे या तक्रारी प्राधान्याने असतात.
पती-पत्नीमधील वादातून कुटुंबच उद्ध्वस्त होते. यात त्यांच्या अपत्यांवरही दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे समुपदेशनातून ते वाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न असतो. एकमेकांच्या चांगल्या आणि वाईट गुणांसह एकमेकांना स्वीकारणे गरजेचे आहे. कोणीही 100 टक्के परफेक्ट नसतो. संसार वाचावा हा आमचा प्रयत्न असतो. शेवटी निर्णय त्यांचा असतो.
-मीरा बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (महिला साहाय्य कक्ष)