कर्जतमध्ये मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उद्घाटन
कर्जत : प्रतिनिधी
श्रीराम आपल्या कणाकणात आहे. श्रीराम हा राष्ट्राचा आत्मा आहे. राम मंदिर म्हणजे राष्ट्राच्या बंधुत्वाचे, चारित्र्याचे, एकतेचे आणि संस्काराचे प्रतीक असून ते आयोध्येत उभे राहणार आहे, असे प्रतिपादन सरखेल कान्होजी आंग्रे यांचे पंधरावे वंशज रायगड जिल्हा संघचालक रघुजीराजे आंग्रे यांनी येथे केले.
अयोध्येत श्री रामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे आणि या करिता सर्व देशभर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत श्री राम मंदिर निर्माण अभियान राबविण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातही हे अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी शहरातील विठ्ठलनगरमधील सावली सोसायटीमध्ये श्री राम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रघुजीराजे आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुका संघचालक विनायक चितळे, तालुका अभियान प्रमुख दिनेश रणदिवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आंग्रे पुढे म्हणाले की, आपली पिढी भाग्यवान आहे. आपल्याला श्रीराम मंदिर उभारणी पहाण्याचा योग आहे. यापूर्वी श्रीराम मंदिरासाठी विटा जमा केल्या त्यावेळीही निधी गोळा केला होता. त्या निधी संकलनातून गेली वीस – बावीस वर्ष श्रीराम मंदिर उभारणीसाठी चिरे कोरण्याचे काम कार्यशाळेत रात्रंदिवस सुरू आहे. त्याचे हिशेबसुध्दा आहेत ते कुणालाही बघता येतील. श्रीराम मंदिर उभारणी ही अनेक पिढ्यांची इच्छा आहे, ती आता त्यांच्या सहभातून पूर्ण होत आहे.
श्रीराम मंदिर उभारणी व्हावी अशी माजी सरपंच कै. अंनतकाका जोशी यांची इच्छा होती. त्यांच्या स्मरणार्थ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश मंदिर उभारणीसाठी देत आहे. असे जाहीर करून नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी धनादेश अभियान प्रमुख दिनेश रणदिवे यांच्याकडे स्वाधीन केला. जैन श्वेतांबर समाजाच्या वतीने एकवीस हजार रुपयांचा धनादेश आणि सतीश दत्तात्रेय श्रीखंडे यांनी अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला.
प्रारंभी बळीराम डोंगरे यांनी अभियान गीत सादर केले. महेश निघोजकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विहिंप प्रखंड मंत्री विशाल जोशी यांनी प्रास्ताविक केले. कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे यांनी सूत्र संचालन केले. पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली. या वेळी नगरसेविका संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, माजी नगरसेवक भालचंद्र जोशी, अविनाश उपाध्ये, केतन जोशी, दीपक बेहेरे, ठमाताई पवार, दिनेश बोरसे, राहुल वैद्य, जयंतीलाल परमार, संजीव दातार, मिलिंद खंडागळे, योगेश चोळकर, केदार भडगावकर, अनंत हजारे, रवींद्र खराडे, भारती म्हसे, गायत्री परांजपे, शर्वरी कांबळे, स्नेहा गोगटे, संजीव दातार आदी उपस्थित होते.