Breaking News

देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!

सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे, परंतु एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आणि सीमेवरील तणावाची स्थिती हाताळण्यात यशस्वी ठरलेले मोदी यांचे नाव देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून कार्वी इनसाइट्स’च्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेतून समोर आले आहे. पोलनुसार जर आज निवडणुका झाल्या तर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा सत्ता काबीज करू शकते.
या सर्व्हेनुसार 3 ते 13 जानेवारीदरम्यान देशातील सुमारे 12 हजार 232 लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 67 टक्के ग्रामीण तसेच 33 टक्के शहरी लोकसंख्येचा समावेश होता. जर आज निवडणूक झाली तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला लोकसभेतील 543 जागांपैकी 321 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएला केवळ 93 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या सर्व्हेमध्ये नागरिकांना मोदी कॅबिनेटमधील सर्वोत्कृष्ट मंत्र्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यात 39 टक्के लोकांनी अमित शहा यांना सर्वांत चांगले मंत्री ठरवले आहे. 14 टक्के मिळून राजनाथ सिंह यांचा दुसरा क्रमांक येतो. नितीन गडकरी या यादीत तिसर्‍या स्थानावर आहेत. त्यांना 10 टक्के लोकांनी पसंती दिली, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आठ टक्के लोकांनी लोकांनी पसंती देत चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे.
कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी 23 टक्के लोकांनी त्यांना योग्य मानले आहे. 50 टक्के लोकांच्या मते या कालावधीत पंतप्रधानांनी चांगले काम केले. 18 टक्के लोकांना या काळातील मोदींचे काम साधारण वाटले, तर सात टक्के लोकांनी नकारात्मक मत व्यक्त केले.
सीएम म्हणून योगी नंबर वन
या सर्व्हेदरम्यान देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्रीबाबत जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये लोकांनी उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हटले आहे. योगींना सर्वाधिक म्हणजे 25 टक्के जनतेने आपला कौल दिला आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply