पनवेल : प्रतिनिधी
महावितरण कंपनीने वाढीव देयके न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता वीज ग्राहकांना वापरत्या विजेची देयके आकारून त्यांना थकबाकीची वीज देयके भरण्यास सवलत देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि त्यातून उद्भवणार्या परिस्थितीची जबाबदारी आपली राहिल, असा इशाराही त्यांनी दिला आहे
आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोविड-19मुळे अनेक उद्योगधंदे, रोजगार तसेच महागाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांना वीज देयक भरणे अडचणीचे झाले आहे. त्यातच महावितरणने वाढीव वीज बिले आकारून ग्राहकांची फसवणूक केल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोविड-19 परिस्थितीचा विचार करून ग्राहकांना वाढीव बिले न देता वापरत्या विजेची बिले आकारून ही बिले टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी यापूर्वीही केली होती. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे महावितरणने वीज बिले न भरलेल्या ग्राहकांची वीज खंडित करण्याचे आदेश दिल्याने ऊर्जामंत्री व महावितरण यांच्यात एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणने वीज ग्राहकांना वापरत्या विजेची देयके आकारून त्यांना थकबाकीची वीज देयके भरण्यास सवलत द्यावी तसेच खरोखरच वाढीव देयके असतील तर संबंधित विभागातील अधिकार्यांनी वीज ग्राहकांशी चर्चा करून वाढीव देयक कसे ते त्यांना समजावून द्यावे. त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे अन्यायकारक असल्याने या विषयाचा गांभीर्याने विचार करून व वस्तुस्थिती लक्षात घेऊन वीजपुरवठा खंडीत करू नये; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि त्यातून उद्भवणार्या परिस्थितीची जबाबदारी आपली राहील, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पत्रातून दिला आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …