Breaking News

अल्टिमेट खो-खो लीग सप्टेंबरमध्ये?

मुंबई ः प्रतिनिधी
भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु स्पर्धेच्या
थेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी पक्का झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच भ्रमणध्वनीवर सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.
भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान लीगच्या पुढील वाटचालीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2019मध्ये अल्टिमेट लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती त्या वेळी ऑक्टोबरमध्ये पहिले पर्व रंगेल, असे सांगण्यात आले होते, परंतु राष्ट्रीय आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे ही लीग आधी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर प्रक्षेपण कराराच्या समस्येमुळे लीगसाठी फेब्रुवारी महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आला. गतवर्षी करोना साथीमुळे मार्च महिन्यापासून जवळपास सर्वच खो-खो स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत.
देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि 18 वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणार्‍या अल्टिमेट लीगच्या अंतिम तारखांविषयी मात्र अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु भारतीय खो-खो महासंघाचे सरचिटणीस महेंद्रसिंग त्यागी यांनी अल्टिमेट लीगपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन 100 टक्के करण्यात येईल याची खात्री दिली. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती येत्या काही महिन्यांत सुधारल्यास आम्ही राष्ट्रीय स्पर्धा तेथेच खेळवू, परंतु तसे न झाल्यास नाइलाजास्तव अन्य राज्यात ही स्पर्धा खेळवावी लागेल, असे त्यागी यांनी सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply