नवी मुंबई पोलिसांचा मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना इशारा
नवी मुंबई : बातमीदार
मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगिंनीपुढे येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण आपली माहिती लपवत आहेत. शासकीय यंत्रणेला सहकार्य करीत नाहीत. अशा तबलिगिंनी येत्या 9 एप्रिलपर्यंत स्वतः हुन समोर यावे आणि आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नवी मुंबई पोलिसांनी दिला आहे. निजामुद्दीन येथील मरकज कार्यक्रमात नवी मुंबईतील काही नागरिक उपस्थित राहिल्याचे उघड झाले आहे. त्यांना वारंवार आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ज्यांनी अद्यापपर्यंत आपली वैद्यकीय तपासणी केली नसेल, त्यांनी येत्या गुरुवारपर्यंत आपली माहिती स्थानिक पोलीस ठाणे, महापालिका कार्यालय किंवा शासकीय कार्यालयाला द्यावी आणि आपली वैद्यकीय तपासणी करून आपल्याला कोरोना विषाणूची बाधा नाही याची खात्री करून घ्यावी.
मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले परदेशी नागरिक जर शहारत असतील तर त्यांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. त्यांची माहिती लपविणार्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त