Breaking News

भाजपचे मिशन मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी असले तरी विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार केला असून, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल, असे म्हटले आहे.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली मुंबई महापालिका म्हणजे मिनी मंत्रालय मानले जाते. राज्याची मुख्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर आहे. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती, मात्र गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे 92, तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते, मात्र राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने भाजपने त्या वेळी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपने दावा केला नाही. परिणामी मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. खरंतर मुंबईचा शिवसेनेचा गड गेल्या वेळीच पडला असता. भाजपने 31 जागांवरून 82पर्यंत मुसंडी मारून शिवसेनेला घाम फोडला होता. भाजपने आणखी जोर लावला असता आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत सभा झाल्या असत्या, तर आज चित्र वेगळे असते. तरीदेखील दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये एका हातावर मोजता येतील इतक्याच जागांचा फरक राहिला. भविष्यात भाजप भारी पडेल या भीतीने संख्याबळ मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना शिवसेनेने गळाला लावले होते, पण आता समीकरणे बदलली आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेवर आहे. आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढवतील, असे आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे, मात्र मुंबईत खुद्द शिवसेनेला ते परवडणारे नाही. जागावाटपात शिवसेना नुकसान कसे बरे सहन करेल? दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. महाआघाडीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादीचे मुंबईतील अस्तित्व नगण्य आहे. त्यांच्यासाठी आघाडी होणे फायदेशीर ठरू शकते. एकंदर पाहता या निवडणुकीत आघाडी झाली किंवा नाही झाली तरी महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण होऊ शकतो. भाजपला मात्र तसा कुठलाही अडथळा नाही. अशातच भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अर्थात लाड यांनी ही भेट वैयक्तिक होती आणि राज यांच्या हाताला दुखापत झाल्याने विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे, तथापि जे आमच्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. भाजप-मनसे युती होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही, पण ती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. मुंबईसह राज्यात मनसेची पीछेहाट झाली असली तरी शिवसेनेची हिंदुत्वाबद्दलची बदलती भूमिका मनसेच्या पथ्यावर पडू शकते. आक्रमक बाणा असलेल्या मनसेला मानणारे लोक आजही सर्वत्र आहेत, तर भाजपची वाढलेली ताकद मनसेला पूरक ठरून दोघांच्याही जागा वाढू शकतात. युती होवो अथवा न होवो, परंतु भाजप पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढविणार याची झलक दिसून येत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply