Breaking News

पावसाचा कहर!

पनवेल : वार्ताहर
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्ववभूमीवर पनवेल महापालिका, अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, तहसिदार कार्यालय कोणतीही परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आहे.

दिघाटी गावातील घरांमध्ये शिरले पाणी

मुसळधार पावसामध्ये पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील रस्ते, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. जिकडेतिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
मंगळवारपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने दिघाटी गाव पुन्हा एकदा पुराच्या पाण्याखाली गेले. येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरांची तळी झाली. रात्रीच्या अंधारात दिघाटी गावावर अस्मानी संकट ओढावले. वार्यासह मुसळधार पावसाने सगळ्यांची झोप उडवली. प्रसंगावधान व समयसुचकता दाखवून त्यांनी आपल्या घराच्या माळ्यावर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे थोडक्यात बचावली.
दिघाटी गावात, घरात आणि अंगणात कुठे गुडघाभर, तर काही घरांमध्ये कमरेभर पाणी शिरले. त्यामुळे घरातील मौल्यवान सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिघाटी गावात दरवर्षी पूर येतो. ते पाहता जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संततधारेमुळे शेतीची कामे खोळंबली

संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे उरण विभागातील, ग्रामीण भागातील शेतीची कामे गेले तीन-चार दिवस खोळंबली असून, शेतीची नांगरणी करण्यासाठी, शेतात तुडुंब पाणी असल्यामुळे पावर टिलर किंवा बैलांचा नांगर शेतात धरायला आधार राहिलेला नाही. आताच शेतीच्या कामांना सुरुवात झाली होती, मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळेच शेतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सुरू करण्यासाठी येथील शेतकरी पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहत आहे.

चिरनेर येथे पुराचे पाणी; ग्रामस्थांचे नुकसान

मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील चिरनेर गावात सदृश्य पुरस्थिती निर्माण झाली असून पहाटे 4 00 वाजताच्या सुमारास गावातील घरांना पूर्वेकडील डोंगराच्या नाल्याचे अतिशय वेगाने सुरू झाल्याने कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती चिरनेर वासियांवर ओढावली आहे. सकाळपर्यंत सुमारे 400 हुन अधिक रहिवाशांच्या घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असून रात्रीच्या सुमारास ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे गावात एकच हाहाकार माजला आहे.
उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. चिरनेर ते मोठीजुई आणि विंधणे, कंठवली ते वेश्वी हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका हा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला बसला असून गावातील सुमारे 400 हुन अधिक घरांना पुराचे पाणी शिरण्याची घटना घडली आहे.

रानसई धरण ओव्हर फ्लो!

उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहु लागले आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणार्‍या आणि डोंगर माथ्यावरून वाहणार्‍या झार्‍यांचे पाणी थेट धरणात मिळणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहु लागले आहे. उरण तालुक्यातील 25 गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एन ऐ डी सह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दिड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. जुन महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता.पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवाती पासुनच धरणक्षेत्रात कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती.

आपटा, गुळसुंदेसह रसायनी परिसर जलमय

सततच्या पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसायनी गुळसुंदे आपटा गावातील जुनाकोळीवाडा, मोहल्ला, बसस्थानक, मोहोपाडा, दांड फाटा-आपटा मेन रोड, बापूजी देवस्थान, ब्राह्मण गल्ली व गुळसुंदे गाव येथे पाणी साठले होते. यात आपटा जुन्या कोळीवाड्यातील श्री गणेश मंदिरात दुपारी मंदिर बुडत असताना तेथील कोळीबांधवांनी श्री गणेशाची आरती केली.
सर्व बाजूने पाणीच पाणी झाले असल्याने नागरिकांना कोठेही जाणे येणे शक्य होत नव्हते. आपटा गावात दरवर्षी पूर येतो. यासाठी पाताळगंगा नदी पात्र खोल करणे गाळ काढणे गरजेचे आहे. जेथून पाणी गावात येते तेथे बांधबंदिस्ती करणे ही सर्व कामे केली पाहिजे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply