पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या वतीने सातत्याने विकासकामे करण्यात येत असून, शहरे, सिडको वसाहती, ग्रामीण भाग असे संतुलन साधले जात आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘अ’मधील पडघे गावामध्ये महापालिकेमार्फत करण्यात येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात आले. पनवेल महापालिकेमार्फत पडघे गावामध्ये पावसाळी गटाराचे बांधकाम करणे, मुख्य नाल्याचे पाइप ड्रेन काढून मोठा नाला बांधणे, रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी विकासकामे तसेच धोकादायक पूल निष्कासित करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी सात हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विविध कामांचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यास स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक अनिल भगत, अमर पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, भाजप प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष तथा माजी सरपंच कृष्णा पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, पांडुशेठ भोईर, हभप नारायण भोईर, के. टी. भोईर, नामदेव भोईर, नाथा महाराज पाटील, आशिष कडू, पवन भोईर, भाऊ पाटील, जगन भोईर, शांताराम दरे, यशवंत भोईर, भरत ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, पंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.