सिडनी : वृत्तसंस्था
नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. खरेतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते, पण युवा भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इयान चॅपल यांनी या मालिकेचे विश्लेषण करताना काही मुद्दे मांडले आहेत.
इयान चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील आपल्या स्तंभात म्हटले आहे की, भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापती या संघासाठी वरदान ठरल्या. त्यामुळे प्रत्येक कसोटीत भारतीय संघाला नव्या, ताज्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करावा लागला. ऑस्ट्रेलियाने बिलकुल याउलट केले. ऑस्ट्रेलिया चारही कसोटी सामन्यात त्याच चार गोलंदाजांना घेऊन खेळली. त्यामुळे मालिकेच्या अखेरीस ते थकले होते.
प्रत्येक कसोटी सामन्यात त्याच चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणे ही ऑस्ट्रेलियाची सर्वांत मोठी चूक होती. वेगवान गोलंदाजांनी पाच आठवड्यात चार कसोटी सामने खेळणे म्हणजे चार मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासारखे आहे. सिडनीत मिचेल स्टार्कच्या बाबतीत ती गोष्ट जाणवली, असे चॅपल यांनी नमूद केले आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper