पनवेल : रामप्रहर वृत्त
आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात होत आहेत. रस्ता सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत, 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमामध्ये शुक्रवारी (दि. 29) पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्तीच्या काळात जीवित हानी कशी कमी करावी, रस्ते अपघातमध्ये जखमी व्यक्तींना कशी मदत करावी, प्रथमोपचार म्हणजे काय? प्रथमोपचाराच्या पायर्या, प्रथमोपचाराचा सुवर्ण नियम, जखमी व्यक्तींना उचलण्याच्या पद्धती, रुग्णशिबिका, दोर, बँडेज इ. व्याख्याना सोबत प्रशिक्षितांना जास्त प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून सदर प्रात्यक्षिके प्रत्येक्ष रित्या करून घेतली.
विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिला पोलीस, पोलीस अधिकारी वर्ग, कर्मचारी यांनी स्वतः प्रात्यक्षिके करून दाखवली. या प्रशिक्षणासाठी हरेश्वर ठाकूर, समीर थळी, अनिकेत गोगर, रिसबुड आणि भरत (कुमार) ठाकूर ह्या सर्व टीमने उपस्थितांना प्रशिक्षण दिले.
या वेळी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, नवी मुंबई उपायुक्त पुरोषत्तम कराड, भागवत सोनवणे, विशेष नियोजक मोहिते, पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस तसेच रिक्षा चालक, टॅक्सी चालक उपस्थित होते.