खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पिस्तूल दाखवून वाहतुकीतून मार्ग काढणार्या आरोपींना रविवारी (दि. 31) खोपोली पोलिसांनी खालापूर न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने या आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मध्यरात्री कारचालक आणि त्यातून प्रवास करणारे लोक पिस्तूल दाखवत ट्रॅफिकमधून रस्ता काढत पुढे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी आर्म अॅक्ट 325अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, हाच व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरून शेअर करीत या संदर्भात थेट शिवसेनेवर आरोप करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. खोपोली पोलिसांनी कराड-कोल्हापूरदरम्यान संबंधित कार व त्यातील विकास गजानन कांबळे (वय 31, रा. मालाड), लकायतर विजय, प्रकाश सीताराम मिश्रा (51, सांताक्रूझ) यांना ताब्यात घेतले होते. या आरोपींना रविवारी खालापूर न्यायालयात नेण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने या आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे.