मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी परिसरातील मोहोपाडा येथून संकष्ट चतुर्थीनिमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्ट चतुर्थीनिमित्त रसायनी परिसरातील वारकरी सांप्रदायाने डोंगरी आळीतून पायी दिंडीला सुरुवात केली. ही पायी दिंडी मोहोपाडा श्री गणेश मंदिराजवळ येताच हभप मारुती खाने यांच्या हस्ते मंदिरातील श्रीगणेशास पुष्पहार घालून पायी दिंडी मोहोपाडामार्गे पुढे निघाली. या वेळी ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिक दर्शन घेताना दिसून आले. टाळ मृदंगावर श्री गणेशाचा जयघोष करीत भगवा झेंडा फडकत दिंडी रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने वरदविनायक महडच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पायी दिंडीत लहानथोरांसह महिलावर्ग श्री गणेशाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे पाहावयास मिळाले.