Breaking News

हिंदू समाजाचा अवमान करणार्‍या शरजील उस्मानीवर तातडीने कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह व गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले आहे. पुणे येथे 30 जानेवारी रोजी आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्‍या दिवशी पुन्हा हत्या करतो, अशा प्रकारची ही गंभीर विधाने आहेत, असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो व त्यावर काहीही कारवाई होत नाही हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याची चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. खरंतर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झाले याची जाणीव असताना अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चूक होते हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली म्हणजे त्यात झालेले सारे प्रकारसुद्धा खपवून घ्यायचे ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले की, मला आशा आहे की हे पत्र मिळताच शरजीलवर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून अशा विधानांचे काय परिणाम होतात या संदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply