Breaking News

बेजबाबदार अधिकार्यांचे निलंबन करा; पनवेल मनपातील सत्ताधार्यांची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

पनवेल : प्रतिनिधी

कर्तव्यात कसूर करणार्‍या पनवेल महापालिकेतील बेजबाबदार अधिकार्‍यांविरोधात मंगळवारी (दि. 2) सत्ताधार्‍यांनी ठिय्या आंदोलन करीत त्यांचे निलंबन करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. या अधिकार्‍यांवर बुधवार (दि. 3)पर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भाजप-आरपीआयच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच इतर अधिकारी सातत्याने बेजबाबदारपणे वागत मनमानी कारभार करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने या अधिकार्‍यांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. स्वच्छता असो किंवा पाहणी वा बैठक काही अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंगळवारी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून अधिकार्‍यांच्या कामचुकारपणाचा सत्ताधार्‍यांकडून तीव्र निषेध करण्यात आला. कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, अनिता पाटील, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे आदी सहभागी झाले होते. बैठकीत, महासभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकारी योग्य उत्तरे देत नाहीत. स्थायी समिती किंवा इतर बैठकांतही वेळकाढू उत्तरे देणे, बैठकांना पदाधिकारी, नगरसेवक हजर झाल्यानंतरही उशिरा येणे, कळंबोली येथे विकासकामांच्या पाहणीला नगरसेवक ठरल्याप्रमाणे सकाळी 8 वाजता हजर असताना अधिकारी 8.30 वाजता, तर कनिष्ठ अधिकारी 9 वाजता हजर राहण्याचा प्रकार सोमवारी घडला. याशिवाय महापालिका हद्दीतील स्वच्छतेत हलगर्जीपणा, एकीकडे स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण सुरू असताना अधिकार्‍यांच्या चुकीच्या कामामुळे मात्र अस्वच्छता दिसून येत आहे. महापालिकेत मंगळवारी दुपारी 3 वाजता बैठक असल्याने महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक महापालिकेत आले असता बैठकीची कोणतीही तयारी नव्हती. याबाबत प्रशासनाला विचारले असता उडवाउडवीची उत्तरे  देण्यात आली. ही बैठक दुपारी 3.30 वाजता रद्द करण्यात येऊन उरण नाक्यावरील मच्छीमार्केटसंबंधी बैठक घेण्यात आली. सहआयुक्त धैर्यशील जाधव या बैठकीला उशिरा आले. त्यांना स्वच्छतेबाबत विचारले असता तेथे स्वच्छता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सदस्य स्वच्छता नसल्याचे सांगत असतानाही जाधव खोटे बोलत असल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर मागवली. तेव्हा तेथे घाण असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्व सदस्य संतप्त झाले आणि जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी सर्वांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनासमोर धरणे धरून निषेध व्यक्त केला आणि बुधवारपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणाच्या अनेक घटना सत्ताधार्‍यांनी मांडत पोलखोलच केली. प्रॉपर्टी टॅक्ससंदर्भात नागरिक अधिकार्‍यांना विचारणा करतात. त्यावर समाधानकारक उत्तरे न देता संबंधित अधिकारी त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात. यावरून हे अधिकारी किती मग्रूरपणे वागतात याचे उदाहरणही त्यांनी या वेळी दिले. त्यामुळे गेंड्याच्या कातडीचे बनलेल्या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची भूमिकाही या वेळी सत्ताधार्‍यांनी स्पष्ट केली.

पनवेलमधील नागरिक सुज्ञ आहेत, पण महापालिकेचे काही अधिकारी बेजबाबदारपणे वागत महापालिकेचे नाव खराब करीत आहेत. त्यांना वेळेवरच आळा घालणे गरजेचे आहे. नाहीतर मनमानी करीत पनवेलला हे विद्रुप करतील. पनवेलच्या नागरिकांसाठी आमचा लढा आहे. सत्तेत असलो तरी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची नेहमीच तयारी आहे.

-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply