Breaking News

पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणार -पंकजा मुंडे

अफवा पसरविणार्‍यांचा घेतला समाचार

अंबाजोगाई : प्रतिनिधी

मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा पसरवत माझ्याबद्दलची भविष्यवाणी काहीजण विनाकारण करत आहेत. मात्र, पक्षाने मला भरपूर दिले असून निर्णय घेण्यास मी खंबीर आहे, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणार्‍यांचा समाचार घेतला. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला राष्ट्रीय सचिवपद देऊन विश्वास टाकला आहे. तो विश्वास मी सार्थ ठरवून दाखवीन, असे अभिवचनही मुंडे यांनी या वेळी दिले.

अंबाजोगाईत आ. नमिता मुंदडा यांच्या वतीने शनिवारी (दि. 24) दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देतांना पंकजा मुंडे बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर आ. नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोरोनाचा कालावधी असल्यामुळे मी मुंबईत अडकून राहिले. मी जर घराबाहेर पडले असते तर माझ्या भोवती मोठा जमाव जमा झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर निघणे टाळले. याचा मोठा गैरअर्थ करून पंकजाताई घराबाहेर पडत नाहीत. अशा अफवा पसरविण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा स्थितीत खा. डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा प्रत्येक कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत होते. त्यांना दिलासा देत होते.

पक्षाने मला भरपूर दिले

माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा, अशा शब्दांत अफवा पसरविणार्‍यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा.

-पंकजा मुंडे

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply