Breaking News

आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

प्रजासत्ताक दिनीच्या हिंसाचारामागे व्यापक कारस्थान होते असे दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच म्हटले आहे. आज जगभरातून समाजमाध्यमांमध्ये भारतविरोधी सूर उमटताना दिसतो आहे, त्या पाठीमागेदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील षडयंत्र तर नाही ना, अशी शंका येते. समाजमाध्यमांवरील शेरेबाजी कुठल्या देशातून किंवा जगाच्या कुठल्या भागातून प्रखरतेने होत आहे हे सहजपणाने कळू शकते. त्याचे थोडे अवलोकन केले तरी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधातील नेमक्या शक्ती कोणत्या आहेत हे कळून येते. दिल्लीच्या सरहद्दीवर सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण मिळत आहे. इतके दिवस शांततापूर्ण रीतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसेचे गालबोट लागले. वाहत्या गंगेत हात धुऊन घेणार्‍या विरोधी पक्षांनी संधीचा पुरेपूर फायदा उठवत त्यात आपला शिरकाव आता साधून घेतला आहे. गेले 70 दिवस आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना पूर्ण मज्जाव होता. तसा तो आता उरलेला नाही. शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते यांच्या खांद्याला खांदा भिडवून फोटो काढून घेण्यासाठी डझनभर राजकीय नेते धडपडताना दिसत आहेत. गुरूवारी तर आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विशेष बस करून दिल्लीची सरहद्द गाठली. आंदोलनाच्या जागेपासून थोड्या अंतरावर बस थांबवून या बस कंपनीने फोटोबिटो काढून घेतले. शेतकरी आंदोलकांना न भेटताच हे प्रवासी मंडळ परतले. विरोधी पक्षांची एक छोटीशी राजकीय सहल तेवढी पार पडली. एखाद्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांना घेरणार हे लोकशाही व्यवस्थेत समजून घेण्याजोगे आहे. विरोधी पक्षांचे ते कर्तव्यच आहे. परंतु विरोधासाठी विरोध करताना आपण देशविघातक वृत्तींना आयती संधी मिळवून देतो आहोत का याचाही विचार व्हायला हवा. भारतातील कृषी कायदे आणि शेतकर्‍यांचे त्याबद्दल असलेले आक्षेप याबद्दल कणभरदेखील माहिती नसणारी नामवंत मंडळी जगभरातून मुक्ताफळे उधळू लागली आहेत. पॉप सिंगर रिहाना, प्रौढ चित्रपटांमधील तारका मिया खलिफा यांच्यासारख्या आगापिछा नसलेल्या अनेकांनी ट्विटरचा उपयोग करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना अकलेचे तारे तोडले आहेत. पर्यावरणवाद्यांचा बुलंद आवाज ठरलेली ग्रेटा थनबर्ग हिनेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यातून विरोधकांना बळ मिळाले हे खरे, परंतु जगातून उमटणारा हा सूर भारत सरकारविरोधी आहे की भारत देशाच्या विरोधातला हे तपासून घ्यायला हवे. भारतामध्ये सामाजिक तेढ वाढावी यासाठी अनेक विघातक शक्ती कार्यरत असतात. त्यांना तोंड देण्यास मोदी सरकार समर्थ आहे. त्यांना येत्या काळात चोख उत्तर मिळेलच. दरम्यान ग्रेटा थनबर्गसारख्या अतिउत्साही आंतरराष्ट्रीय व्यक्ती कुठलाही अभ्यास न करता बेताल भारतविरोधी बडबड करतात, तेव्हा त्यांनाही भारतातील राष्ट्रवाद्यांकडून खणखणीत उत्तर मिळत आले आहे. गानसरस्वती लता मंगेशकर यांच्यापासून कंगना राणावतपर्यंत आणि सचिन तेंडुलकरपासून अजय देवगणपर्यंत अनेक भारतीय सेलेब्रिटींनी रेहाना, ग्रेटा थनबर्ग यांना ट्विटरवरूनच सडेतोड उत्तरे दिली आहेत. दरम्यान, मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने तोंड भरून कौतुक केले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असो किंवा देशांतर्गत एकांगी विरोध असो, या सार्‍यामागे व्यापक षडयंत्र असेलच तर त्याला खणखणीत उत्तर देण्यास सारा देश तयार आहे हेदेखील तितकेच खरे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply